अहमदनगर - जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या स्वीय सहायकावर गोळीबार केल्याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. ऋषिकेश वसंत शेटे असे त्या पोलिसांनी मुसक्या आवळलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी ऋषिकेशला नेवासे तालुक्यातील हनुमानवाडी येथून अटक केली आहे.
लोहगाव शिवारात झाला होता हल्ला - मंत्री शंकरराव गडाखांचे सोनई येथील कामकाज आटोपून स्वीय सहाय्यक राजळे आपल्या घरी चालले होते. यावेळी लोहगाव शिवारात तीन ते पाच जणाने पिस्तुलातून पाच गोळ्या झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. विकास राजळे यांच्या तक्रारीवरून चार जणावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. शुक्रवारी पहाटे ऋषिकेशला त्याच्या राहत्या घरापासून जवळ अटक करण्यात आली.
तीन आरोपी अटकेत, बबलू लोंढे अद्यापही फरार - स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, गणेश इंगळे व पथकाने ही कारवाई केली. ऋषिकेशला अटक झाल्याचे समजताच सोनई परिसरात समाधान व्यक्त करण्यात आले. तपास अधिकारी पोलीस उपाधीक्षक सुदर्शन मुंढे, पोलीस निरीक्षक विजय करे यांनी आरोपीची कसून चौकशी केली. चार पैकी तीन आरोपीस अटक झाली असून बबलू लोंढे हा अजूनही फरार आहे.