अहमदनगर - दंडकारण्य अभियानांतर्गत दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी संगमनेर तालुक्यात वटसावित्री पौर्णिमेनिमित्त १ हजार ११ वटवृक्षांचे रोपण करण्यात आले. यावेळी वट, पिंपळ, उंबर यांसह सर्व देव वृक्ष हे सर्वाधिक ऑक्सिजन देणारे असल्याने या सर्व वृक्षांचे नागरिकांनी संवर्धन करावे, असे आवाहन नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी केले.
हेही वाचा - कोपरगाव बसस्थानकावर खळबळ, मुलीचे अपहरण करणाऱ्याला नागरिकांचा दणका
संगमनेर नगर परिषदेच्या वतीने माझी वसुंधरा अभियानांतर्गत संगमनेर शहरात विविध ठिकाणी वृक्ष रोपण व पूजन करण्यात आले. तसेच, तालुक्यात दुर्गाताई तांबे यांच्या उपस्थितीत खांडगाव, कवठे कमळेश्वर, चिखली, निळवंडे येथेही वट पूजन व वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी सुनंदा दिघे, स्मिता बांगर, निर्मला गुंजाळ, अर्चना बालोडे, सौदामिनी कानोरे, राधाबाई गुंजाळ, मुक्ताबाई पवार, मनीषा उकिरडे, कवठे कमळेश्वरच्या सरपंच मीराताई भडांगे, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर यांसह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.
दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून संगमनेर हे हरित शहर, स्वच्छ शहर होत आहे. यामध्ये नागरिकांचाही मोठा सहभाग आहे. वटसावित्री पौर्णिमेला भारतीय परंपरेत मोठे स्थान असून यानिमित्त देव वृक्षांची आपण पूजा करतो. हे वृक्ष सर्वाधिक ऑक्सिजन देणारी आहेत. संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथील तीनशे वर्षांपूर्वीचा महाकाय वटवृक्ष हा संगमनेर तालुक्याचे वैभव आहे. याचे ऐतिहासिक महत्त्वहसुद्धा वेगळे आहे. कोरोनाच्या संकटामुळे सर्वांना प्राणवायूची मोठी उणीव भासली. या पुढील पिढ्यांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये याकरिता सर्वांनी वृक्षांचे रोपण, संवर्धन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामध्ये पिंपळ, वड, उंबर, कडुनिंब, चिंच या वृक्षांचे रोपण व संवर्धन करणे अत्यंत गरजेचे आहे. या वृक्षांमुळे जमिनीची धूप कमी होत असून पर्यावरण संतुलनामध्ये या वृक्षांचे मोठे कार्य आहे. वृक्षांमुळे हिरवीगार सावली, परिसराचे वैभव, सजिवांसाठी शुद्ध ऑक्सिजन मिळणार असून ग्लोबल वॉर्मिंगची वाढलेली समस्या कमी करण्यासाठी सर्वांनी वृक्ष संवर्धन करून हिरवाई निर्माण करावी, असे आवाहन त्यांनी केले.
हेही वाचा - भावाच्या मदतीने पत्नीकडून पतीचा खून, कोपरगावातील धक्कादायक घटना