अहमदनगर- जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्वात पहिले तयार झालेल्या चोंभूत येथील 10 बेडच्या कोरोना केअर सेंटरचा लोकार्पण सोहळा खासदार सुजय विखे व तहसीलदार ज्योती देवरे यांच्या हस्ते झाला. चोंभूत येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सुरू करण्यात आलेल्या कोरोना कोविड सेंटरमध्ये (सीसीसी) दोन बेड हे ऑक्सिजन सुविधा असलेले आहेत.
खासदार सुजय विखे यांनी नुकताच पारनेर तालुका दौरा करून तालुक्यातील कोरोना प्रदूर्भावाची माहिती घेतली. कोरोनाच्या दुसऱ्या स्ट्रेनमध्ये ग्रामीण भाग मोठ्या प्रमाणात प्रभावित होत असल्याचे समोर येत आहे. यामुळे तालुका आणि जिल्हा ठिकाणी कोविड केअर सेंटरवर मोठा ताण येत आहे. त्यामुळे गाव पातळीवर एक गाव किंवा तीन-चार गावे मिळून कोविड केअर सेंटर(सीसीसी) सुरू करणे गरजेचे असल्याचे खासदार विखे यांनी सांगितले. या कामी तहसीलदार, प्रांत, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य यांनी पुढाकार घेऊन ही सेंटर सुरू करावीत. आपण शक्य तेवढी औषध तसेच चांगल्या पद्धतीने चालणाऱ्या सेंटरला आर्थिक मदत करू असे खासदार विखे यांनी सांगितले. आरोग्य विभागाची औषधे, जिल्हाधिकारी स्तरावर ऑक्सिजनच्या मदतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे खासदार विखे यांनी आश्वासन दिले. कोरोनाचा प्रादुर्भाव मोठा असल्याने ग्रामनिधीचा याकामी वापर तसेच लोकवर्गणी गरजेची असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा-जाणून घ्या, राज्यातील विविध शहरांमधील लसीकरणाची स्थिती
चोंभूतचा आदर्श इतर गावांनी घ्यावा-
मार्गदर्शक सूचनानुसार पारनेर तालुक्यातील 131 गावात ग्राम कोरोना सुरक्षा समिती स्थापित होत आहे. त्यात चोंभूत येथे ग्राम कोरोना सुरक्षा समिती आणि ग्राम सहभागातून पहिले कोविड केअर सेंटर स्थापित झाल्याची माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली. इतर गावांनी पण चोंभूत गावाचा आदर्श घेत कोविड केअर सेंटर सुरू करावीत, शासन स्तरावर मदत उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासन तहसीलदार देवरे यांनी दिले. यात लोकसहभाग गरजेचा आहे. स्थानिक खाजगी डॉक्टरांनी आपला सहभाग सामाजिक जबादारी म्हणून घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
हेही वाचा-केंद्राकडून मिळाला लशींचा मोजकाच साठा; मुंबईत पुढील तीन दिवस लसीकरण बंद