शिर्डी ( अहमदनगर ) : भाजपला अडवण्यासाठी आम्ही कोणासोबतही आघाडी करायला तयार असून, महाविकास आघाडीसोबत जाण्याचा प्रस्ताव ( MIM Proposal To MVA ) दिल्याची माहिती एमआयएम प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी दिली. याबाबत काँग्रेसचे नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट करताना मोठे विधान केले आहे. ही युती शक्य नसल्याचे म्हणत एमआयएम कट्टरतावादी असल्याचे थोरात यांनी सांगितले ( Balasaheb Thorat Rejects MIM Proposal ) आहे.
भाजप- एमआयएमचा कट्टरतावाद एकच
काँग्रेसला कोणत्याच समाजाचा, धर्माचा कट्टरवाद मान्य नाही. आम्हाला सर्व धर्म समभाव हवा आहे. सर्वांना सोबत घेऊन जाण्याचं तत्वज्ञान आम्ही मानतो आणि त्यानुसार पुढे जात आहोत. भाजपचा कट्टरवाद आणि एमआयएमचा कट्टरवाद हा एकच असून ही मान्य होणारी गोष्ट नसल्याचे थोरात संगमनेर येथे म्हणाले.
महाविकास आघाडीच्या 170 आमदारांची एकजूट भक्कम
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीतील अनेक आमदार संपर्कात असल्याचे विधान केले. त्यावर बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडीच्या 170 आमदारांची एकजूट भक्कम आहे. भाजपचा कोणताही नेता काही बोलणार आणि आम्ही त्यांना उत्तर द्यावं ही अपेक्षा योग्य नाही. परंतु जितके ते प्रयत्न करतील, तितकी आमची मैत्री पक्की होत जाणार. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर आमचा विश्वास आहे. आम्ही सर्व एकत्र काम करत असून महाविकास आघाडी भक्कम असल्याचं यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.