अहमदनगर - भारतीय दहशतवाद विरोधी आघाडीचे अध्यक्ष मनिंदर सिंह बिट्टा आज(22 ऑगस्ट) शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी, 'माजी केंद्रीय मंत्री चिदंबरम यांनी घोटाळे करून देशाला लुटले आहे, असा आरोप करत त्यांच्यावर सक्त कारवाई व्हायला हवी असल्याचे मत व्यक्त केले. तसेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत आजवर कोणी केली नव्हती. त्यांनादेखील आज चौकशीला सामोरे जावे लागत आहे. हा आजचा हिंदुस्थान आहे. जो घोटाळे करील तो आत जाईल', अशा शब्दात त्यांनी सरकार करत असलेल्या कारवायांना आपले समर्थन दर्शवले.
पत्रकारांशी संवाद साधत असताना बिट्टा यांनी सरकारच्या कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाचे कौतुक केले. ते म्हणाले, "370 कलम रद्द झाल्याने काश्मीरला स्वातंत्र्य मिळाले आहे. मोदी-शाहांनी हा धाडसी निर्णय घेतला. आता फक्त पाक व्याप्त काश्मीर हाच मुद्दा शिल्लक आहे. एका वर्षानंतर जेव्हा काश्मीर मध्ये शिक्षण, रोजगार, व्यापार, उद्योग या क्षेत्रांमध्ये विकास होईल तेव्हा, यापुर्वीच्या सरकारांना जनता जाब विचारेल."
आता देशातील नक्षलवाद्यांना सुधारण्याची गरज आहे. नक्षलवादी सुधारले नाही तर त्यांना जगंलात घुसुन गोळ्या घातल्या जातील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.