अहमदनगर - पुण्याच्या निरंजन सेवाभावी संस्था आणि नगरच्या बांगडीवाला उद्योग समूहाच्यावतीने दिव्यांग-गतिमंद-वंचित विद्यार्थ्यांसाठी आंबे खाण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्नेहालय, उत्कर्ष आदी विविध संस्थेत शिकत असलेल्या २०० विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या निमित्ताने सहभागी होत हापूस आंब्यांवर ताव मारला. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद अवर्णनीय असाच होता.
स्पर्धा असल्याने मुलांनी जास्तीत जास्त आंबे खावेत. आंबे खाण्याबरोबरच त्यांना बक्षीस मिळवल्याचा आनंदही घेता यावा या उद्देशाने दरवर्षी स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यावेळी मुला-मुलींनी १०० डझन आंबे फस्त केले. काहींनी दोन, काहींनी पाच आंबे खाल्ले. एका स्पर्धक विद्यार्थ्याने तर चक्क सोळा आंबे खाऊन पारितोषिक पटकावले.
आयोजकांतर्फे नैसर्गिकरित्या पिकवलेल्या हापूस आंबा स्पर्धेसाठी उपलब्ध केला होता. विद्यार्थ्यांच्या आरोग्याला कसलीही हानी न होता आंबे खाण्याचा आनंद त्यांना लुटता यावा असे नियोजन करण्यात आले होते.
बांगडीवाला उद्योग समूहाचे जितेंद्र बिहाणी, उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी सेवाभावी उद्देशाने या स्पर्धेचे प्रायोजत्व गेल्या दोन वर्षांपासून स्वीकारले आहे. लहान मुले ही लाजरे-बुजरे असतात. त्यात दिव्यांग-गतिमंद मुलांमध्ये न्यूनगंड असू नये. त्यांनाही इतर मुलांप्रमाणे जीवनाचा निरागस आनंद लुटता यावा, या उद्देशाने निरंजन सेवाभावी संस्था वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असते.
हुरडा पार्टी, पतंग उडवा स्पर्धा, आंबे-खा स्पर्धा अशा उपक्रमातून निसर्गाने दुजाभाव केलेल्या आणि समाजात वंचित समजल्या जाणाऱ्या मुलांसाठी त्यांच्या जीवनात आनंद फुलवण्याचे काम करत आहे. त्याचबरोबर संस्थेने एक हजार मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे. या सेवाभावी कार्यात समाजातील सशक्त घटकाने आर्थिक मदतीचा हात दिला पाहिजे. किमान एक विद्यार्थी शिकवण्याची जबाबदारी घेण्यासाठी पुढे यावे असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.