अहमदनगर - एखाद्या सस्पेंस चित्रपटाच्या कथानकाला लाजवेल असे गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य अहमदनगर जिल्ह्यातील राजूर पोलिसांनी अमेरिकेतील इन्शुरन्स कंपनीच्या मदतीने समोर आणले आहे. सत्य समोर येताच माणूस पैशासाठी कुठल्या थराला जातो यासह कशी मर्डर मिस्ट्री करतो हे कटू सत्य पोलिसांनी उघड केले आहे. जिल्ह्यातील अकोले तालुक्यात राहणारा प्रभाकर भिमाजी वाघचौरे (वय 54, रा. राजूर, ता. अकोले, जि. अहमदनगर)हा व्यक्ती गेली वीस वर्षे अमेरिकेत वास्तव्यास होता. अमेरिकेत असताना त्याने पाच मिलियन डॉलर्स (भारतीय रुपयात 38 कोटी रुपये)ची डेथ इन्शुरन्स पॉलिसी काढली.
पाच मिलियन अमेरिकन डॉलर्सच्या पॉलिसी साठी बनाव-
गेल्या वर्षी प्रभाकर वाकचौरे हा अमेरिकेतून पुन्हा भारतात आपल्या गावी आला. त्यानंतर त्याच्या डोक्यात एक कल्पना सुचली. स्वतःच्या मृत्यूचा अपघाती मृत्यू दाखवून डेथ इन्शुरन्स पॉलिसीचे पाच मिलियन डॉलर्स कमवण्यासाठी त्याने अजून चार साथीदारांचा आपल्या प्लॅनमध्ये समावेश केला. त्यानुसार एकाने सर्पमित्राकडून खोटे कारण सांगून एक विषारी साप बरणीत आणला. इतर दोघांनी एक वेडसर मनोरुग्ण शोधून आणला. चौथ्याने राजूर याठिकाणी एक रूम भाड्याने पाहून ठेवली होती.
आरोपींनी थंड डोक्याने मनोरुग्णाला दिला सर्प दंश-
ठरलेल्यानुसार मनोरुग्णाला एक दिवस भाड्याच्या रूमवर ठेवून दुसऱ्या दिवशी पहाटे चारच्या सुमारास जंगलात नेले, तेथे त्याच्या पायाला सर्पदंश दिला. सर्प दंशाने मनोरुग्णाचा तासाभरात मृत्यू झाला. त्यानंतर 108 नंबरवर फोन करून पहाटे फिरायला गेले असता सर्पदंश झाल्याचे सांगून अम्ब्युलस बोलावण्यात आली. मात्र, एम्ब्युलन्स येण्यापूर्वी मृत्यू झाला असल्याने 108 नंबरच्या अम्ब्युलस चालकाने बॉडी नेण्यास नकार दिला. त्यानंतर प्रभाकर वाकचौरे वगळता इतर चौघांनी बनाव करून सर्पदंशाने हत्या केलेल्या व्यक्तीला प्रभाकर वाकचौरे भासवून राजूर ग्रामीण रुग्णालयात नेऊन पोस्टमार्टेम करून घेतले. रुग्णालय व पोलिसांकडे मृत व्यक्ती वाकचौरे असल्याची नोंद करून घेतली. यामुळे राजूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून घेतली. ही घटना 19 एप्रिल रोजी घडली. आरोपीतील एकजण पंच झाला तर एकाणे तो प्रभाकर वाकचौरे असल्याचा पोलिसांना निर्वाळा दिला. यानंतर मृत व्यक्तीवर राजूरच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
इन्शुरन्स कंपनीला संशय आणि पोलिस तपासात आरोपी झाले जेरबंद-
हा सर्व प्लॅन जानेवारी 21 ते एप्रिल 21 मध्ये आखण्यात आला होता. अनेक गोष्टींवर विचार करून सर्पदंश देऊन मृत्यू घडवून आणायचा, त्यासाठी एखादी निराधार वेडसर व्यक्ती पकडून आणायची असे ठरवण्यात आले. वास्तविक प्रभाकर वाकचौरे याने पाच मिलियन डॉलर्सच्या डेथ इन्शुरन्स साठीचा केलेला बनाव व्यवस्थित पार पडला होता. मात्र, अमेरिकेतील ज्या ऑल इंडिया ऑल स्टेट इन्शुरन्स अमेरिका कंपनीकडे क्लेम होता, त्या कंपनीकडे प्रभाकर वाकचौरे याने अमेरिकेत असताना पत्नी जिवंत असताना तिचा मृत्यू झाल्याचे कळवून इन्शुरन्स क्लेम लाटण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तो फसला गेला होता. ही हिस्ट्री असल्याने कंपनीला त्याच्या मृत्यूची माहिती मिळाल्यावर संशय आला आणि त्यांनी कंपनी इन्व्हेस्टीगेटर मार्फत अहमदनगर पोलिसांना तपास करण्यास सुचवले. संगमनेर उपअधीक्षक आणि राजूर पोलिसांनी याबाबत खबऱ्यामार्फत गुप्त तपास सुरू केला.
राजूर पोलीस ठाण्यात आता गुन्हा दाखल झाला
पोलिसांना वाकचौरे जिवंत असून तो अकोले तालुक्यातील धामणगाव पाट या गावी नातेवाईकांकडे राहात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी खबऱ्यामार्फत अधिक माहिती घेतल्यावर खात्री पटताच आपल्याच मृत्यूचा बनाव रचणाऱ्या वाकचौरेला वडोदरा (गुजराथ) येथून ताब्यात घेतले. पोलिसी हिसका दाखवताच त्याने केलेला बनाव आणि त्यातील इतर चार साथीदारांची नावे सांगितली. त्यानुसार पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सविस्तर माहिती मिळवली. या सर्वांवर अपहरण, हत्या, फसवणूक आदी कलमांव्यय राजूर पोलीस ठाण्यात आता गुन्हा दाखल झाला आहे. ज्या मनोरुग्णाचा हकनाक बळी गेला तो अकोले तालुक्यातीलच असून त्याचे नाव नवनाथ यशवंत आनप (रा-धामणगाव ता-अकोले) असे आहे.
हे आहेत पाच आरोपी-
या प्रकरणी आरोपी 1) प्रभाकर भिमाजी वाघचौरे 2) संदिप तळेकर, (रा. पैठण, ता. अकोले) 3) हर्षद रघुनाथ लहामगे, (रा. राजुर, ता. अकोले) 4) हरिष रामनाथ कुलाळ (रा. कोंदणी, ता. अकोले) 5) प्रशांत रामहरी चौधरी (रा. धामणगाव पाट ता अकोले) पोलिसांच्या अटकेत आहे. या प्रकरणाची सर्व माहिती अहमदनगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पाच मिलियन डॉलर्सच्या (भारतीय 38 कोटी रुपये) रकमेसाठी स्वतःच्याच मृत्यूचा बनाव करणारा वाकचौरे याच्यासह सर्व आरोपींना नगरमध्ये आणण्यात आले होते.
हेही वाचा - आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज उच्च न्यायालयात सुनावणी