अहमदनगर - दुष्काळामुळे मराठवाडा आणि विदर्भासह राज्य होरपळून निघत आहे. मात्र आचारसंहितेचे कारण पुढे करत प्रशासनातील काही अधिकारी मंत्र्यांनी दिलेल्या दुष्काळी उपाययोजनांच्या आदेशाकडे कानाडोळा करत आहेत. त्यामुळे, अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी केली आहे.
यासंदर्भात नवले यांनी सरकारला इशारा दिला आहे. दुष्काळात मराठवाडा आदी भाग होरपळत असताना अधिकारी जर आचारसंहितेच्या नावाखाली उपाययोजना दाबत असतील, तर किसान सभा आणि शेतकऱ्यांची मुले हे खपवून घेणार नाहीत. मंत्र्यांचेच न ऐकणाऱ्या अधिकाऱयांवर सरकारने कडक कारवाई केली पाहिजे, असे नवले म्हणाले.
सरकार एकीकडे चारा छावणी चालकांचे देयके देत नाही. चारा-पाण्याची टंचाई आहे. उष्माघाताने लोकं-जनावरे दगावत आहेत, अशा भीषण परिस्थितीचे गांभीर्य सरकार आणि अधिकाऱ्यांनी ओळखून तातडीने उपाययोजना केल्या पाहिजेत, अशी मागणीही नवले यांनी केली आहे.