अहमदनगर - येणाऱ्या काळात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे, कोरोना नियंत्रणासाठी संशयितांची तपासणी वाढविण्यासह सर्व्हेक्षणावर भर द्यावा, अशी सूचना ग्रामविकासमंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज (गुरुवार) संगमनेर येथे केली.
संगमनेर नगर परिषदेच्या सभागृहात कोरोना प्रादूर्भावाचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ बोलत होते. ते म्हणाले, राज्याच्या तुलनेत संगमनेरमध्ये मृत्यूचा दर अधिक असून ही चिंतेची बाब आहे. कोरोनामुळे रुग्णाचा मृत्यू होणे दुर्देवी असून वेदनादायी आहे. कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणासाठी शासनाने जारी केलेल्या सूचनांचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे. यामध्ये प्रशासनाने नागरिकांना मास्क वापरणे अनिवार्य करतांनाच सूचनांचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
कोरोनाशी मुकाबला करण्याचा अनुभव नसतानाही गावपातळीवर सरपंच, ग्रामसेवक, आशा वर्कर, नर्सेस, वॉर्डबॉय, डॉक्टर, नगरसेवक तसेच विविध पदाधिकारी, तालुका व जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या कार्याची प्रशंसा केली. कोणतीही अडचण, गरज भासल्यास माझ्याशी कोणीही आणि केव्हाही संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी आमदार सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, श्रीरामपूरच्या नगराध्यक्षा अनुराधा आदिक, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधिक्षक अखिलेशकुमार सिंह, उपविभागीय अधिकारी शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम आदी यावेळी उपस्थित होते.