अहमदनगर - समाजात नकोशी म्हणून मुलीला हिणवले जाते. काही ठिकाणी तर भ्रूणहत्येमुळे निष्पाप मुलींना जीव गमवावा लागल्याचेही दिसून येतेय. मात्र कोळगाव येथील कुटूंबाने पहिल्यांदा कन्यारत्न झाल्यानंतर वाजत गाजत मिरवणूक काढून चिमुकलीचे स्वागत केले. यातून त्यांनी भ्रूणहत्या करणाऱ्यांना चपराक लगावली आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील गणेश गाडेकर यांना पहिलीच मुलगी झाल्याने गाडेकर कुटुंबात स्री जन्माचे जोरदार स्वागत करण्यात आले. गाडेकर यांच्या पत्नी सोनाली यांनी कोळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गोंडस कन्यारत्नाला जन्म दिला. घरात पहिल्या कन्येचे स्वागत करण्यात संपूर्ण कुटुंब व्यस्त झाले. प्राथमिक आरोग्य केंद्रापासून सजवलेल्या गाडीतून माता व मुलीला वाजत गाजत घरापर्यंत घेऊन आले. चिमुकलीचे नाव ठेवलेले नसल्याने गाडीवर वेलकम प्रिंसेस लिहिण्यात आले होते. रस्त्याने लोकांना मिठाईचे वाटप करण्यात आले. या अनोख्या पद्धतीने स्री जन्माचे स्वागत करून गाडेकर कुटुंबाने स्रीभ्रूण हत्या करणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचा प्रयत्न केला आहे.