अहमदनगर : दरवर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमीनंतर सर्वत्र दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शिर्डीतील दहीहंडी उत्सवदेखील काही मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत भक्तांविनाच साजरा करण्यात आला आहे.
शिर्डीत दहीहंडी उत्सव साईबाबांच्या हयातीतच सुरू झाला होता. शिर्डीत त्या काळी रामनवमी, गुरुपौर्णिमा आणि गोकुळाष्टमी हे प्रमुख उत्सव साजरे केले जात असत. शिर्डीत श्रावण वद्य अष्टमीला गोकुळाष्टमी साजरी करण्यात येते. तर, नवमीला दुपारी दहीहंडीने या उत्सवाची सांगता होते. मात्र, दरवर्षी उत्साहात साजरा होणाऱ्या दहीहंडी उत्सवावर यंदा कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे, आज गोपाळकाल्याच्या दिवशी सकाळी समाधी मंदिरात दहा ते बारा या वेळेत किर्तन झाले. त्यानंतर साई संस्थानचे कार्यकारी अधिकारी यांच्या समवेत मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत साई मंदीरात दहीहंडी फोडली गेली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्या भक्तांसाठी साई मंदीर बंद असुन रामनवमी, गुरुपोर्णिमा उत्सवानंतर आजचा गोपाळकाल्याचा उत्सवही साध्या पध्दतीनेच साजरा करण्यात आला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या चार महिन्यांहून अधिकचा काळ झाला भक्त मंदीरात जावू शकले नाहीत. दरवर्षी साईमंदीरात ग्रामस्थांच्या उपस्थीत दहीहंडी फोडण्यात येते. मात्र यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे त्यांना ऑनलाईनच दहीहंडी उत्सवात सहभागी व्हावे लागले. आज साई बाबांच्या मुर्तीला सुवर्ण अलंकरांनी सजविण्यात आले होते. साईंच्या मुर्तील रत्नजडीत सुवर्ण मुकूट परिधान करण्यात आला असुन मंदीरात फुलांची सजावटही करण्यात आली आहे.