अहमदनगर - शिर्डी लोकसभा मतदार संघातून काँग्रेसने श्रीरामपूरचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, त्यांच्या पुढे जिल्ह्यातील काँग्रेसांतर्गत वाद शमवून विखे आणि थोरात गटाचे मनोमिलन घडवण्याचे आणि आपले पारडे जड करण्याचे मोठे आवाहन असणार आहे.
काँग्रेसचे दिग्गज नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील काय भूमिका घेणार हे गुलदस्त्यात आहे. मात्र, असे असताना आणि शिर्डीतून काँग्रेसचा उमेदवार कोण? याबाबत तर्क-वितर्क लढवले जात असताना मंगळवारी रात्री शिर्डी मतदारसंघातून काँग्रेस पक्षाने श्रीरामपूरचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांना उमेदवारी जाहीर केली. याच बरोबरीने जिल्हाध्यक्षपदीही श्रीरामपूरचे माजी आमदार स्वर्गीय जयंत ससाणे यांचे पुत्र करण ससाणे यांची वर्णी लावली आहे. यामुळे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या दोन्ही शिलेदारांना ताकद देऊन पक्षाने विखे यांची पक्षांतर्गत कोंडी केल्याचे बोलले जात आहे. कांबळे हे शांत स्वभावी आणि सर्वांशी जुळवून घेणारे व्यक्ती असल्याने त्यांची उमेदवारी लवकर जाहीर करत काँग्रेसने शिर्डी मतदार संघावर अधिक लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे.
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नगरमधून उमेदवारीची दावेदारी केल्याने डॉ. सुजय विखे हे शिर्डीतून शिवसेनेला मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असणार आहेत. त्यामुळे कांबळेंना उमेदवारी देवून काँग्रेसने मोठी चाल खेळली आहे. कांबळे यांना आता राधाकृष्ण विखे आणि बाळासाहेब थोरात या दोघांचाही पाठींबा मिळवावा लागणार आहे. त्यामुळे ते यात किती यशस्वी होतात यावर मतदार संघातील काँग्रेसच्या विजयाचे गणित अवलंबून आहे.
राधाकृष्ण विखे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला उधाण आलेले आहे. त्यांनी पक्षांतर केल्यास कांबळे हेदेखील त्यांच्या समवेत कमळ हाती घेतील, असा राजकीय कयास लावला जात होता. मात्र, कांबळेंनाच रिंगणात उतरवत ही शक्यता काँग्रेस पक्षाने आता संपुष्टात आणली आहे. आमदार कांबळे आणि ससाणे गटात गेल्या काही दिवसांत राजकीय मतभेद झाल्याचे बघावयास मिळाले होते. पण श्रीरामपुरातीलच दोघांवर काँग्रेस पक्षाने विश्वास दाखवला आहे. शिर्डीतून अद्याप शिवसेनेने अधिकृत उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यात सध्या भाजपमध्ये असलेल्या माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरेंना निवडणूक लढविण्याची तीव्र इच्छा असल्याने ते काय भूमिका घेतात हे महत्वाचे असणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत वाकचौरेंचा पराभव झाल्यानंतर त्यांनी भाऊसाहेब कांबळेंच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. आता पुन्हा कांबळे आणि वाकचौरे, अशी लढाई होईल का? गेल्या २ लोकसभा निवडणुका जिंकलेली शिवसेना कोणाला उमेदवारी देणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.