अहमदनगर - राज्यात गेल्या काही काळापासून जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे नियम-निकषांत अडकून न पडता ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
राधाकृष्ण विखे म्हणाले की, एखाद्या भागात २४ तासांत ६५ मिलीमीटर पाऊस झाला तरच नुकसान भरपाई मिळण्याचा जुना नियम आहे. तो बदलण्याची गरज आहे. अतिवृष्टीमुळे चार दिवसांत अनेक भागात शंभर मिलीमीटर पाऊस झाला आहे. काही ठिकाणी ओढे, नाले फुटल्याने शेतात पाणी भरले आहे. त्यामुळे सरकारने जुना निकष बदलून सरसकट पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी.
या संदर्भात राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे एक निवेदन दिले आहे. मागील महिन्यापासून सतत सुरू असलेल्या परतीच्या पावसाने राहता तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. यात वाकडी परिसरात सोयाबीन, बाजरी, मका, आदी खरिप पिकांना धोका निर्माण झाला आहे. तर, ऊस यासारख्या पिकांचेही मोठे नुकसान झाले असून सुमारे 80 टक्के पिके पाण्याखाली गेली आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
काही ठिकाणी डाळिंब फळबाग काढणीस असताना सततच्या पावसाने शेतात पाणी साचल्याने, तयार फळ गळून खाली पडत आहेत. या पिकांचे पंचनामे करण्याची गरज असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शेळके यांनी सांगितले.
हेही वाचा - पाथर्डी तालुक्यातील संततधार पावसाने पिके पाण्यात; शेतकरी दुहेरी संकटात
हेही वाचा - धबधब्यात पडलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा शोध सुरूच; एनडीआरएफ दाखल