अहमदनगर - राज्य सरकारने सुपरमार्केट आणि मोठ्या आकाराच्या किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयाला जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी विरोध केला असून, नुकतेच अण्णांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून या पद्धतीने खुलेआम वाईन विक्रीचा निर्णय मागे घ्यावा अन्यथा प्राणांतिक उपोषण आंदोलन करू, असा इशारा दिला होता. मात्र, मुख्यमंत्री कार्यालय अथवा राज्यसरकारकडून बहुधा अण्णांच्या पत्राची दखल घेतलेली दिसत नाही. कारण अण्णांच्या पत्राला सरकारकडून अद्याप कसलेही उत्तर आलेले नाही. या नंतर अण्णांनी आज शनिवारी मुख्यमंत्री यांच्या नावाने एक स्मरणपत्र धाडले असून, यात वाईन विक्री निर्णयाला तीव्र विरोध करत सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे.


हेही वाचा - Murder In Akole : दोघांचे भांडण, तिसऱ्याचा मृत्यू.. दांड्याने डोक्यात मारून केली हत्या
सरकारने समाजमनाचा विचार न करता घेतलाय निर्णय -
पत्रात अण्णा म्हणतात, युवाशक्ती ही राष्ट्रशक्ती आहे. ही युवाशक्तीच राज्य आणि राष्ट्र घडवू शकेल. यावर आमचा विश्वास आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक परिवाराचे उज्वल भविष्य ज्या मुलींना, युवतींना घडवायचे, जिच्या हाती पाळण्याची दोरी। ती जगाला उद्धारी। या युवतींवर या वाईनच्या वातावरणाचा काय दुष्परिणाम होईल, एकूण समाजावर काय परिणाम होतील, याचा सरकारने विचार केलेला दिसत नाही. फक्त मिळणाऱ्या महसुलाचा मर्यादीत विचार केलेला दिसतो. ज्या सत्तेमध्ये समाज, राज्य, राष्ट्र हिताचा विचार नसेल, अशी सत्ता काय कामाची? ज्यांनी राज्य चालवायचे आहे त्यांनी जनतेचा सल्ला न घेता आपल्या मनाला जे योग्य वाटते असे निर्णय घेणे म्हणजे लोकशाही नव्हे. लोकशाही ही लोकांची आहे. ती लोकांची, लोकांनी, लोकसहभागातून चालविली पाहिजे, अन्यथा इंग्रजांच्या आणि आमच्या हुकूमशाहीत फरक राहणार नाही, असे कडक बोल अण्णांनी सरकारला सुनावले आहे.
समाज हेच माझे कुटुंब -
चौथी पाचवीतील विद्यार्थी सांगू शकेल की, वाईन ही समाजाला घातक आहे. पण, ज्यांनी राज्य चालवायचे आहे त्या सरकारला कळू नये, ही बाब दुर्दैवी आहे. पन्नास वर्षांपूर्वी आमच्या गावात पस्तीस दारूभट्ट्या होत्या. आज 22 वर्षांत गावात कोणत्याही दुकानात बीडी, सिगारेट, तंबाखू, गुटखा सुद्धा विक्रीला नाही. आणि सरकार मात्र सुपरमार्केट आणि किराणा दुकानात वाईन ठेवण्याचा निर्णय करते. यावर खेद व्यक्त करत, भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी माहितीचा अधिकार, ग्रामसभेला जादा अधिकार, दप्तर दिरंगाई, बदल्यांचा कायदा, जनतेची सनद, लोकपाल कायदा, ग्रामरक्षक दल कायदा यांसारखे दहा कायदे वेगवेगळ्या पक्ष पार्ट्यांच्या सरकारवर जनशक्तीचा दबाव निर्माण करून सरकारला भ्रष्टाचाराला आळा घालणारे दहा कायदे करायला भाग पाडले. भ्रष्टाचाराला ज्यांनी आळा घालायचा असे गृहमंत्रीच जर पैसे जमविण्याचा विचार करत असतील तर काय होणार या राज्याचे प्रश्न आहे, अशी उपरोधिक टीका अण्णांनी सरकारवर केली आहे.
सरकारने माझ्या पत्राला अजून उत्तर दिलेले नाही -
नुकतेच महाराष्ट्र सरकारने राज्यातील सुपरमार्केट आणि किराणा दुकानामध्ये वाईन विक्रीला ठेवण्याचा परवाना देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय महाराष्ट्र राज्यासाठी अत्यंत दुर्दैवी निर्णय असल्याने आमच्या येणाऱ्या पिढ्यांसाठी घातक असल्याने मी या सरकारचा निषेध करण्यासाठी प्राणांतिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंबंधाने राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना रजिस्टर पोस्टाने पत्रव्यवहार केला आहे. उत्तर नाही, असेही अण्णांनी पत्रात म्हटले आहे.
राज्यातील संघटना - संस्थांची लवकरच बैठक -
अण्णांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या नावे लिहलेल्या पत्रात आपण उपोषणावर ठाम असल्याचे सांगत जनतेला आवाहन केले आहे की, माझे राज्यात उपोषण होईल त्यावेळी कार्यकर्त्यांनी माझ्या प्रमाणे सर्वांनी उपोषण करू नये. कारण जनतेच्या हितासाठी मी वेळोवेळी बावीस वेळा उपोषणे केली आहेत. मी तारुण्यातच व्रत घेतले आहे की, जोपर्यंत जगायचे आहे, तो पर्यंत समाज आणि देशाची सेवा करायची आहे. आणि ज्या दिवशी मरायचे ते समाज, राज्य आणि देशाची सेवा करता करताच मरायचे आहे. म्हणून मी अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्ही विवाहित असल्यामुळे अण्णा हजारेची उपोषणाची नक्कल करून चालणार नाही. मात्र, समाज आणि देशाचे मी काही देणे लागतो, ही जाणीव ठेवून होईल तेवढी सेवा करावी. समाज, राज्य आणि देशाची सेवा यासाठीच मनुष्य जन्म आहे. राज्यातील बऱ्याच संस्था आणि संघटनांनी शासनाने घेतलेल्या वाईनच्या निर्णयाच्या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक संघटना संपर्कात येत आहेत. लवकरच राज्यातील अशा संस्था आणि संघटनांनी कोणत्याही पक्ष पार्टीच्या विरोधात आंदोलन न करता समाज, राज्य आणि राष्ट्र हिताचा विचार करून अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करण्यासाठी आंदोलनाची दिशा काय असावी, आंदोलन कुठपर्यंत करावे याचा विचार करण्यासाठी राज्यातील काही संस्था आणि संघटनांची बैठक आम्ही राज्याच्या वेगवेगळ्या विभागात घेण्याचा विचार करीत आहोत, असे अण्णांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा - Old Currency In Shirdi : भक्तांकडून साईबाबांना जुन्या नोटांचं दान.. तिजोरीत तीन कोटींच्या बंद नोटा