लंडन - जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेली बेलारुसची टेनिसपटू आर्यन सबालेंका हिने विम्बल्डन २०२१ ची उपांत्य फेरी गाठली आहे. तिने उपांत्यपूर्व फेरीत ट्युनिशियाच्या २१व्या मानांकित ऑन्स जॅबीउर हिचा ६-४, ६-३ असा एकतर्फा पराभव केला. उपांत्य फेरीत तिचा सामना चेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना प्लिस्कोव्हा हिच्याशी आहे.
आर्यन सबालेंकाने संपूर्ण सामन्यात जॅबीउर हिच्यावर वर्चस्व राखले. तिने पहिला सेट ६-४ ने जिंकत आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये जॅबीउर काही उलटफेर करणार का याची उत्सुकता होती. परंतु सबालेंकाने तिला संधीच दिली नाही आणि दुसरा सेट ६-३ अशा एकतर्फा जिंकत उपांत्य फेरीत धडक दिली.
रशियाचा डेनिल मेदवेदेव बाहेर
पोलंडच्या ह्युबर्ट हर्काज याने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या डेनिल मेदवेदेवला पराभवाचा धक्का दिला. त्याने, मेदवेदेवचा २-६, ७-६(२), ३-६, ६-३, ६-३ असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. हर्काज याचा पुढील सामना आठ वेळचा विम्बल्डन विजेता रॉजर फेडररशी होणार आहे.
कॅरोलिना प्लिस्कोव्हा पहिल्यांदाच उपांत्य फेरीत...
दुसरा उपांत्यपूर्व सामना चेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना प्लिस्कोव्हा आणि स्वित्झर्लंडच्या व्हिक्टोरिजा गोलुबिक असा झाला. या सामन्यात कॅरोलिना हिने व्हिक्टोरिजावर ६-२, ६-२ ने सरळ सेटमध्ये पराभव करत उपांत्य फेरी गाठली. कॅरोलिनाने प्रथमच उपांत्य फेरी गाठली आहे. यासाठी तिला तब्बल ९ वर्षे वाट पाहावी लागली. उपांत्य फेरीत दुसऱ्या मानांकित सबालेंका विरुद्ध आठव्या मानांकित कॅरोलिना असा सामना होणार आहे.
हेही वाचा - नऊ वर्षांची प्रतीक्षा अखेर फळाला, अॅश्ले बार्टी Wimbledon २०२१ च्या उपांत्य फेरीत
हेही वाचा - रॉजर फेडरर : इंग्लंड ग्रँडस्लॅम इतिहासात उपांत्यपूर्व फेरी गाठणारा वयस्कर खेळाडू