रोम - जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या रॉजर फेडररचे इटालियन ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्याचे स्वप्न भंगले आहे. २० ग्रँडस्लॅम विजेत्या असलेला फेडरर क्वार्टर फायनलच्या सामन्यापूर्वी दुखापतग्रस्त झाल्याने त्याला अर्ध्यावरच ही स्पर्धा सोडावी लागली.
इटालियन ओपनच्या क्वार्टर फायनलमध्ये फेडररचा सामना ग्रीसच्या स्टेफानो त्सित्सिपासशी होणार होता. मात्र, या सामन्यापूर्वी पायाला दुखापत झाल्याने फेडररने आपले नाव मागे घेतले. त्यामुळे स्टेफानो क्वार्टर फायनलचा सामना न खेळताच सेमीफायनलमध्ये पोहचला आहे.
सेमीफायनलमध्ये स्टेफानोचा सामना वर्ल्ड नंबर-२ राफेल नादालशी होणार आहे. २० वर्षीय स्टेफानोने यापूर्वी ऑस्ट्रेलियन ओपनच्या क्वार्टर फायनलमध्ये रॉजर फेडररला पराभवाचा धक्का देत स्पर्धेतुन बाहेर केले होते. त्यामुळे नादालला स्टेफानोविरुद्ध सावध खेळ करावा लागणार आहे.
याच स्पर्धेत महिला एकेरीत अग्रमानांकित असलेल्या जपानची नाओमी ओसाकानेही दुखापतीमुळे माघार घेतली आहे.