पॅरिस - जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिच आणि 'लाल मातीचा बादशहा' स्पेनचा राफेल नदाल यांच्यात फ्रेंच ओपनच्या विजेतेपदासाठी आज लढत होणार आहे. जोकोव्हिचने उपांत्य फेरीत ग्रीसच्या स्टेफानोस त्सिसिपासविरुद्ध 6-3, 6-2, 5-7, 4-6, 6-1 असा संघर्षपूर्ण विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. तर, दुसरीकडे नदालने एकही सेट न गमावता अर्जेंटिनाच्या दिएगो श्वार्त्झमनचा तीन सेटमध्ये सरळ 6-3, 6-3, 7-6 असा धुव्वा उडवत 13व्यांदा अंतिम फेरीत पोहोचला.
राफेल नदाल फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकून आपल्या 20व्या ग्रँडस्लॅम विजेतेपदाला गवसणी घालण्यासाठी प्रयत्नशील आहे. नदालने आजचे विजेतेपद पटकावले तर तो रॉजर फेडररच्या ग्रँडस्लॅम विक्रमाशी बरोबरी साधेल. दुसरीकडे, जोकोव्हिच 'बिग थ्री'मधील ग्रँडस्लॅमच्या विजेतेपदाचा गॅप कमी करण्यासाठी उत्सुक आहे. जोकोव्हिचने आतापर्यंत 17 ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावली आहेत.
नदाल-जोकोव्हिच हे आतापर्यंत 56 सामन्यांत एकमेकांसमोर आले आहेत. यात २९ सामने जोकोव्हिचने जिंकली आहेत. तर, नदालने 17 सामन्यांत बाजी मारली आहे. पण फ्रेंच ओपनचा रेकॉर्ड पाहिल्यास दोघांमध्ये सात सामने झाले आहेत. यात सहावेळा नदालने बाजी मारली आहे.