नवी दिल्ली - कोरोना व्हायरसमुळे पुढे ढकलल्या गेलेल्या क्रीडा स्पर्धांमध्ये फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेचे नावही जोडले गेले आहे. रोलँड गॅरोस म्हणून प्रसिद्ध असलेली ही स्पर्धा सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. वर्षाची दुसरी ग्रँड स्लॅम स्पर्धा आता २० सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर दरम्यान खेळली जाईल. मंगळवारी आयोजकांनी याची घोषणा केली.
हेही वाचा - VIDEO : प्रात्यक्षिकाद्वारे सचिनने सांगितला कोरोनावरचा उपाय
यापूर्वी ही स्पर्धा २४ मे ते ७ जून या कालावधीत होणार होती. 'स्पर्धेसाठी तयारी करीत असलेल्या लोकांचे आरोग्य आणि सुरक्षितता लक्षात घेऊन फ्रेंच टेनिस फेडरेशनने सध्याच्या काळात फ्रेंच ओपन २०२० रोलँड गॅरोस पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आता ही स्पर्धा २० सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर २०२० या कालावधीत खेळली जाईल', असे फ्रेंच टेनिस फेडरेशनने एका निवेदनात म्हटले आहे.
चीनमधून पसरलेल्या कोरोना विषाणूने जगभरात ६ हजाराहून अधिक लोकांचा जीव घेतला आहे. तर भारतातही कोरोनाचे १३०हून अधिक रुग्ण आढळले आहेत. कोरोनामुळे भारतात ३ जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याकडून कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात येत आहेत.