नवी दिल्ली - दारा सिंग म्हटलं की आपल्यासमोर उभं राहतं ते चित्र म्हणजे २०० किलोच्या आणि विश्वविजेता असलेल्या किंग काँगला रिंगच्या बाहेर फेकणारा एक असाधारण व्यक्ती. या पराक्रमामुळे त्यांना 'रुस्तम-ए-हिंद' पदवी मिळाली होती. आज दारा सिंग यांचा जन्मदिन. पंजाबच्या अमृतसर येथे 19 नोव्हेंबर 1928 ला दारा सिंग यांचा जन्म झाला.
हेही वाचा - स्टोक्सच्या 'त्या' पुस्तकावरून आयपीएलच्या दोन संघांमध्ये भांडण!
किंग काँगवर मात -
आपल्या कुस्तीच्या प्रतिभावान शैलीमुळे दारा सिंग यांनी भारताचे नाव जगभरात पोहोचवले. त्यांच्या 500 सामन्यांमध्ये त्यांना कोणीही पराभूत करू शकले नाही. किंग काँगला मात दिल्यानंतर ते रातोरात सुपरस्टार स्टार झाले. लहानपासून कुस्तीची आवड असणाऱ्या दारा सिंग यांनी सिंगापूरमध्ये मलेशियन चॅम्पियन तारलोक सिंगला पराभूत करून आपला विजय प्रवास सुरू केला.
१९५४ मध्ये दारा सिंग यांनी भारतीय कुस्ती स्पर्धेचे जेतेपद जिंकले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रकुल चॅम्पियनचा मानही मिळवला. दारा सिंग यांनी तब्बल ३६ वर्षे कुस्तीची सेवा केली. वयाच्या ५५ व्या वर्षी १९८३ मध्ये त्यांनी कुस्तीतून निवृत्ती घेतली. अजिंक्य असल्याबद्दल दारा सिंग यांचे ऑब्झर्व्हर न्यूज लेटर हॉल ऑफ फेममध्ये नाव आहे. शिवाय,ते २००३ ते २००९ पर्यंत राज्यसभेचे खासदारही होते.
बॉलिवूड प्रवास -
एकेकाळी दारा सिंग यांचे नाव बॉलिवूड अभिनेत्री मुमताजशी जोडले गेले होते. 'किंग काँग' चित्रपट हिट झाल्यानंतर दारा सिंग जेव्हा त्यांच्या दुसर्या चित्रपट 'फौलाद'साठी अभिनेत्री शोधत होते तेव्हा त्या दोघांची भेट झाली. त्यावेळी कुस्तीपटूबरोबर कोण काम करेल?, असे सांगत सर्वांनी दारा सिंग यांच्याबरोबर चित्रपट करण्यास नकार दिला होता. त्याचवेळी चित्रपटाच्या सेटवर आपल्या बहिणीसमवेत आलेल्या मुमताज त्या चित्रपटाची नायिका म्हणून प्रसिद्धीस आल्या. अशा प्रकारे मुमताज आणि पैलवानची जोडी गाजली.
१९६३ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'फौलाद' या चित्रपटात मुमताज आणि दारा एकत्र दिसले. दोघांच्या प्रेमाच्या चर्चा रंगल्या होत्या. पण जशी मुमताजची कारकीर्द बहरू लागली, तसे दोघांमधील संवाद कमी होत गेले. एका मुलाखतीत दारा सिंग म्हणाले होते, 'बॉलिवूडने मुमताजला माझ्याकडून हिरावून घेतले.'
अल्पवयीन असतानाच बाप -
दारा सिंग यांची दोन लग्नं झाली होती. वयाच्या १४ व्या वर्षी त्यांचे पहिले लग्न बच्चनो कौरशी झाले होते. त्यावेळी बच्चनो कौर ह्या दारा सिंगपेक्षा वयाने मोठ्या होत्या. अल्पवयीन असतानाच दारा सिंग एका मुलाचे बाप झाले होते. १९५२ मध्ये लग्नाच्या १० वर्षानंतर बच्चनो कौर यांचे निधन झाले. यानंतर, दारा सिंग यांनी १९६१ मध्ये सुरजित कौरशी लग्न केले. त्यावेळी दारा सिंग पहारेकरी म्हणून काम करायचे. त्यांना ३ मुले आणि ३ मुली आहेत. त्यापैकी आपल्या सर्वात परिचयाचं नावं म्हणजे 'विंदू दारा सिंग'.
अभिनेता आणि कुस्तीपटू दारा सिंग यांचे मुंबईत १२ जुलैला वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले. दारा सिंग यांनी १०० हून अधिक हिंदी-पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले आहे. अशा या 'रुस्तम-ए-हिंद'ला ईटीव्ही भारतचा सलाम.