नवी दिल्ली : अदानी ग्रुप आणि कॅप्री ग्लोबलने पाच महिला प्रीमियर लीग संघांसाठी बोली जिंकल्या आहेत. तसेच पुरुषांचा आपीएल संघ मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या संघांसाठी बोली जिंकली आहे. महिला प्रीमियर लीगचा पहिला हंगाम यावर्षी मार्चमध्ये खेळला जाण्याची शक्यता आहे. मुंबई, दिल्ली, बंगळुरू, अहमदाबाद आणि लखनौ या पाच विजयी फ्रँचायझींचे संघ असतील. महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सत्रात प्रत्येक संघात एकूण 18 खेळाडू सहभागी होतील. ज्यामध्ये 5 विदेशी खेळाडू असतील. 4 परदेशी खेळाडू कसोटी खेळणाऱ्या राष्ट्रातील असतील आणि 1 खेळाडू सहयोगी देशाचा असणार आहे. त्याचबरोबर 5 संघांमध्ये एकूण 22 सामने खेळले जाणार आहेत.
आयपीएलच्या पहिल्या सत्राचा विक्रम मोडला: अदानी ग्रुप, अदानी स्पोर्ट्सलाइनला सर्वाधिक १२८९ कोटींची बोली लावून अहमदाबादची फ्रँचायझी मिळाली. इंडिया फिन्स स्पोर्ट्स लिमिटेडने 912.99 कोटी रुपयांची बोली लावून मुंबई फ्रँचायझी विकत घेतली. रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडने बेंगळुरू 901 कोटी, जीएसडब्ल्यु जीएमआर दिल्लीने 810 कोटी आणि कॅप्री ग्लोबल होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेड लखनऊने 757 कोटी रुपयांची बोली जिंकली. एकूणच, महिला प्रीमियर लीगसाठी 4669.99 कोटी रुपयांची बोली लावण्यात आली होती. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे मानद सचिव जय शाह म्हणाले की, आगामी महिला प्रीमियर लीगमधील संघांसाठी एकूण बोली म्हणून बीसीसीआयने 4669.99 कोटी रुपये कमावले आहेत. यासह 2008 मधील पुरुषांच्या आयपीएलच्या पहिल्या सत्राचा विक्रम मोडला गेला आहे.
लिलाव प्रक्रिया सुरळीत: बीसीसीआयचे अध्यक्ष श्री रॉजर बिन्नी म्हणाले, संघांसाठी यशस्वीपणे बोली लावल्याबद्दल मी विजेत्यांचे अभिनंदन करतो. या लीगमुळे भारतातील आणि परदेशातील खेळाडूंना एकत्र शिकण्याची आणि वाढण्याची संधी मिळेल. यामुळे अधिकाधिक महिला क्रिकेटपटूंचा समावेश होऊन तळागाळातील विकासाचा मार्ग मोकळा होईल. लिलाव प्रक्रिया सुरळीत पार पडल्याबद्दल मी बीसीसीआय संघाचे अभिनंदन करू इच्छितो. मला खात्री आहे की, ही लीग आमच्या महिला क्रिकेटपटूंना जागतिक मंचावर चमक दाखवण्यास मदत करेल.
महिला आयपीएल : व्हायकॉम 18 ने आगामी महिला आयपीएलचे मीडिया हक्क पाच वर्षांसाठी हस्तगत केले आहेत. व्हायकॉम 18 ने हे हक्क तब्बल 951 कोटी रुपयांना विकत घेतले आहेत. त्यांनी लिलावात डिस्ने स्टार आणि सोनीसह इतर बोलीदारांना मागे टाकले आहे. महिला आयपीएलचे उद्घाटन मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. या स्पर्धेत पाच संघ सहभाग घेणार असून सर्व सामने मुंबईत होणार आहेत.