टोकियो - भारताची 19 वर्षीय महिला कुस्तीपटू अंशु मलिकचे टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. अंशुला रेपेचाज राउंडमधून कास्य पदक जिंकण्यासी संधी होती. या सामन्यात देखील तिचा पराभव झाला.
अंशु मलिकने 57 किलो वजनी गटात भारताचे प्रतिनिधित्व केलं. तिला बेलारुसच्या एरिना कुराचकिना हिने 8-2 ने पराभूत केलं. यानंतर बेलारुसची खेळाडू पुढील सामने जिंकत अंतिम फेरीत पोहोचली. यामुळे अंशु मलिकला रेपेचाज राउंडच्या माध्यमातून कास्य पदकासाठी सामना खेळण्याची संधी मिळाली होती.
अंशु मलिक हा सामना जिंकून कास्य पदक जिंकेल, अशी देशवासियांची आशा होती. परंतु तिचा रशियाचे वेलेरिया हिने 5-1 ने पराभव केला. या पराभवासह अंशु मलिकचे टोकियो ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात आले.
कुस्तीमध्ये भारताने आतापर्यंत 5 पदकं जिंकली
सुशील कुमारने भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये सलग दोन वेळा पदक जिंकलं. सुशीलने 2008 बिजिंग ऑलिम्पिकमध्ये कास्य तर 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकलं होतं. सुशील शिवाय योगेश्वर दत्तने 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये कास्य पदक जिंकलं होतं. तर 2015 रिओ ऑलिम्पिकमध्ये साक्षी मलिकने कास्य पदक जिंकले होते. खाशाबा जाधव भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारे पहिले कुस्तीपटू होते. त्यांनी 1952 मध्ये हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये हा कारनामा केला होता. आता टोकियो ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू रवी कुमार दहिया अंतिम फेरीत पोहोचत एक पदक निश्चित केलं आहे.
हेही वाचा - Tokyo Olympics : पुरूष हॉकी संघाने 41 वर्षांनंतर जिंकलं पदक, जर्मनीला नमवत 'कांस्य'वर केला कब्जा
हेही वाचा - Tokyo Olympic : रवी दहियाला सुवर्ण पदक जिंकण्याची संधी; 2 वेळचा जगज्जेत्याशी आज होणार लढत