टोकियो - भारतीय महिला बॉक्सिंगपटू लवलिना बोर्गोहेन हिचे 69 वजनी गटात सुवर्ण पदकाचे स्वप्न भंगले आहे. उपांत्य फेरीत लवलिनाचा टर्कीच्या बुसेनाझ सुर्मेनेली हिने पराभव केला. या पराभवामुळे लवलिनाला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. दरम्यान, हे भारताचे तिसरे पदक आहे. याआधी मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य तर पी. व्ही. सिंधूने बॅडमिंटन महिला एकेरीत कांस्य पदक जिंकलं आहे.
उपांत्य फेरीत लवलिना बोर्गोहेनचा सामना विश्व चॅम्पियन टर्कीच्या बुसेनाझ सुर्मेनेली हिच्याशी झाला. या सामन्यात बुसेनाझ हिने निर्विवादीत वर्चस्व राखले. तिने हा सामना 5-0 असा जिंकला. दरम्यान, लवलिना जरी सामना गमावला तरी तिने या सामन्यात विश्व चॅम्पियनसमोर कडवे आव्हान उभारले होते.
पहिल्या फेरीत लवलिना 5-0 ने पराभूत झाली. पाच पंचांनी बुसेनाझ हिला संपूर्ण 10-10 गुण दिले. तर लवलिनाच्या खात्यात 9-9 गुण प्राप्त झाले. दुसऱ्या फेरीत लवलिना उलटफेर करेल, अशी भारतीयांची आशा होती. पण या फेरीत देखील बुसेनाझ वरचढ ठरली. हा सेट देखील तिने 5-0 असा जिंकला. पाच पंचांनी बुसेनाझ हिला संपूर्ण 10-10 गुण दिले. तर लवलिनाला 9-9 गुणांवर समाधान मानावे लागले.
तिसऱ्या फेरीत देखील हीच स्थिती राहिली आणि अखेर लवलिनाचा 5-0 ने पराभव झाला. या पराभवामुळे लवलिनाचे सुवर्ण पदकाचे स्वप्न भंगले आणि तिला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. आसामच्या २३ वर्षीय लवलिनाने उपउपांत्यपूर्व सामन्यात जर्मनीच्या नॅडिन अपेट्झला ३-२ असे नमवले. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत चायनीज तैपईच्या नीन-शेन चेनला ४-१ अशी धूळ चारून तिने पदक पक्के केले होते.
लवलिना तिसरी बॉक्सर -
लवलिना बॉक्सिंगमध्ये पदक जिंकणारी भारताची तिसरी बॉक्सर ठरली. याआधी भारताचे विजेंदर सिंग आणि एम. सी. मेरी कोम यांनी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकलं आहे.
हेही वाचा - Tokyo Olympics : कुस्तीपटू अंशू मलिक कांस्य पदकाच्या शर्यतीत
हेही वाचा - Tokyo Olympics : कुस्तीपटू दीपक पुनिया उपांत्य फेरीत