नवी दिल्ली -आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारा जलतरणपटू वीरधवल खाडेने निवृत्तीचे संकेत दिले आहेत. देशातील जलतरण सुविधा बंद राहिल्यास निवृत्तीबाबत विचार करू शकतो. देशात अनेक क्रीडा सुविधा उघडल्या आहेत, पण जलतरण तलाव अजूनही बंद आहेत. आगामी काळात ही सुविधा खुली होण्याची चिन्हे दिसत नाहीत, असे वीरधवल म्हणाला.
वीरधवलने आपल्या ट्विटमध्ये जलतरण तलावांबद्दलची परिस्थिती स्पष्ट करण्यास सांगितले आहे. त्याने आपल्या ट्विटमध्ये क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनाही टॅग केले.
तो म्हणाला, तीन महिने झाले मी तरणतलावात उतरलेलो नाही. जर इतर खेळाडू प्रशिक्षणादरम्यान सोशल डिस्टन्सिंगचे अनुसरण करू शकतात तर जलतरणपटूदेखील करू शकतात. मला आशा आहे, की ऑलिम्पिकमधील संभाव्य जलतरणपटू या परिस्थितीत निवृत्तीबद्दल विचार करणार नाहीत.
थायलंड, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड या भागांसह इतरही अनेक ठिकाणी तरणतलावात उघडले गेले आहेत. भारतातही गृहमंत्रालयाने अटींसह बाजारपेठ, शॉपिंग मॉल्स सुरु केले आहेत. भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (एसएआय) ही सुविधा सुरू करण्यासाठी आणि मानक ऑपरेटिंग प्रक्रिया (एसओपी) तयार करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे.