नाशिक - कोणताही खेळ खेळण्यासाठी वयाची मर्यादा नसते. इच्छा शक्ती, जिद्द आणि चिकाटी असली तर तुम्ही कुठलेली शिखर पार करू शकता, असे मत नाशिकच्या पोलीस कर्मचारी धावपटू अश्विनी देवरे यांनी व्यक्त केले आहे. महिलांनी स्वतःचे आरोग्य जपण्यासाठी नियमित व्यायाम करण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे. ईटीव्ही भारतने अश्विनी देवरे यांच्याशी खास बातचीत केली.
पोलीस खात्यात गेल्या 20 वर्षांपासून कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलीस आश्विनी देवरे यांनी स्वतःची पी. टी. उषा म्हणून ओळख निर्माण केली आहे. नाशिकच्या लहानशा जायखेडा गावातील सर्वसाधारण कुटुंबात अश्विनी देवरे यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती जेमतेम होती. घरातील कोणीच शिक्षित नव्हते. मात्र लहानपणापासून आश्विनी यांना शिक्षणाची आणि खेळाची आवड होती. शाळेतील सर्वच खेळाच्या स्पर्धेत त्यांचा सहभाग असायचा. सुरुवातीला खेळून काय मिळणार, म्हणून घरच्यांचा विरोध होता, मात्र आयुष्यात उत्कृष्ट खेळाडू बनण्याची जिद्द मनात बाळगून चौथीत असताना धावण्याचा स्पर्धेत त्यांनी भाग घेतला. यात त्यांनी पहिल्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले. मग त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही.
विभागीय आंतरशालेय स्पर्धेत त्यांनी स्वतःची चुणूक दाखवत अनेक पदके पटकावली. 2001मध्ये त्या मुंबईच्या पोलीस दलात दाखल झाल्या. या काळात त्यांनी वेटलिफ्टिंग करण्यास सुरुवात केली. त्यातही अनेक पदके पटकून इतरांना प्रशिक्षण देखील दिले. मात्र मणक्याचा त्रास सुरू झाल्याने त्या पुन्हा धावण्याच्या स्पर्धेकडे वळल्या आणि मागील पंधरा वर्षात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 45हून अधिक सुवर्णपदकांसह 400 हून अधिक पदके त्यांनी पटकवली. मागील 15 वर्षांपासून अश्विनी देवरे ह्या नाशिक शहर पोलीस दलात आपले कर्तव्य बजावत असून धावण्याच्या अनेक स्पर्धांमध्येही सहभागी होत यशाची शिखरे पार करत आहे.
अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश...
अश्विनी देवरे यांनी मलेशिया, श्रीलंकासोबत बंगळुरू, राजस्थान, जयपूर, हैदराबाद येथील स्पर्धेत सहभाग घेऊन पदके पटकवली आहे. 40हून अधिक सुवर्णपदकांसोबत अनेक रौप्य, कांस्य पदके त्यांना मिळाली आहेत. गुजरात येथे झालेल्या हाफ आयर्नमॅन स्पर्धा पुर्ण करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील पोलीस खात्यातील पहिला मानही त्यांच्या नावावर आहे.
रुढी परंपरांना फाटा देत जोडीदार निवडला...
ग्रामीण भाग असो किंवा शहर लग्नात हुंडा परंपरा आजही सुरू आहे. त्यात ग्रामीण भागात अधिक प्रमाणात मुलांना लाखो रुपयांचा हुंडा देण्याची परंपरा आहे. मात्र ह्या रुढी परंपरांना फाटा देत आश्विनी देवरे यांनी आपला जोडीदार निवडला आणि हुंडा विरोधी दिनाच्या दिवशी त्या विवाह बंधनात अडकल्या.
मुलांना पाळणा घरात ठेऊन केला सराव...
पोलीस खात्याची 12 तासांची ड्यूटी, पती देशसेवेसाठी लष्करात असल्याने दोन मुलांना सांभाळण्याची जबाबदारी अश्विनी देवरे यांच्यावर येऊन पडली. त्यांनी पोलीस खात्याची ड्युटी सांभाळत मुलांना चांगले शिक्षण दिले आहे. मुले लहान असताना त्यांना पाळणाघरात ठेवून ड्युटीसोबत धावण्याचा सराव देखील त्यांनी केला. आता मुले समजुतदार झाली असल्याने त्यांची काहीशी चिंता कमी झाली असून त्यांनी आपले लक्ष धावण्याच्या सरावावर केंद्रित केले आहे. आगामी काळात जागतिक विक्रम करण्याचे लक्ष असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा - भारताचा मोठा पराक्रम, नोंदवला सलग १३वा कसोटी मालिकाविजय