सांगली - कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सांगलीमध्ये आयोजित करण्यात आलेली महापौर चषक कुस्ती स्पर्धा आणि एकांकिका करंडक नाट्य स्पर्धा पालिकेच्या वतीने रद्द करण्यात आली आहे. कोरोनाबाबत खबरदारी म्हणून पालिकेच्या वतीने २८ पथके व शहरातील सार्वजनिक ठिकाणी औषध फवारणी मोहीमही सुरू करण्यात आली आहे.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सांगली महापालिकेकडून सर्व त्या खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. पालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेली महापौर चषक कुस्ती स्पर्धा आणि मदनभाऊ पाटील महाकरंडक एकांकिका स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. दरवर्षी प्रमाणे १३ मार्च रोजी एकांकिका स्पर्धा तर १६ मार्च रोजी महापौर चषक कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात येत होती. मात्र देशात आणि राज्यात कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, राज्य शासनाच्या वतीने जत्रा, यात्रा गर्दीचे कार्यक्रम रद्द करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पालिका प्रशासनाने आयोजित केलेल्या कुस्ती व नाट्य स्पर्धा तात्पुरता रद्द करत पुढील काळात घेण्यात येतील असे स्पष्ट करण्यात आले आहे. कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी पालिका प्रशासन सज्ज झाली असून, आरोग्य विभागासह २८ पथके तयार करण्यात आली आहेत. तसेच सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता आणि औषध फवारणी मोहीम सुरू करण्यात आली आहे.
कोरोना व्हायरसबाबत नागरिकांनी घाबरून न जाता आरोग्य यंत्रणेकडून सूचित करण्यात आलेल्या सूचनांचे पालन करावे, गर्दीत जाणे टाळावे, तसेच सातत्याने हात साबणाने धुवावेत आणि जर कोणाला सर्दी ताप खोकला तसेच श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर त्यांनी तात्काळ आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे आवाहनही पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.