भंडारा - छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल हे समस्यांचे माहेरघर बनले आहे. घाणीने भरलेले शौचालय, पिण्यासाठी अशुद्ध पाणी, मुलींसाठी चेंजिंग रूम नाही, अशा एक ना अनेक समस्या मागील कित्येक महिन्यांपासून सुरू आहेत. मात्र जिल्हा क्रीडा अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे खेळाडूंना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
या जिल्हा क्रीडा संकुलात हँडबॉल, हॉकी, व्हॉलीबॉल, स्केटिंग, बास्केटबॉल, कराटे, टेबल टेनिस असे विविध खेळ शिकवले आणि खेळले जातात. मात्र खेळाडूंसाठी अत्यंत गरजेचे असलेल्या सुविधांचा मोठ्या प्रमाणात अभाव या मैदानावर जाणवतो.
इथे असलेले शौचालय मागील कित्येक महिन्यांपासून अस्वच्छ आहे. त्यामुळे शौचालयास जाणे अजिबात शक्य नसल्याने मुलांना उघड्यावरच बाथरूम आणि शौचालयासाठी जावे लागत आहे. त्यातच जर मुलींना काही शारीरिक अडचणी आल्यास त्यांना सरळ घरी जावे लागते. सध्या भंडारा जिल्ह्याचे तापमान 45 डिग्री सेल्सिअसपर्यंत गेले आहे. त्यामुळे खेळाडूंना सरावादरम्यान मोठ्या प्रमाणात पिण्याची पाण्याची गरज भासते. मात्र या मैदानात पिण्यासाठी शुद्ध पाणी नसल्याने मुलांना घरूनच आपल्यासाठी पाणी आणावे लागत आहे. सायंकाळ झाली की संपूर्ण ग्राउंडवर अंधाराचे साम्राज्य पसरते.
सर्वात गंभीर गोष्ट म्हणजे येथे खेळायला येणाऱ्या मुलींसाठी वेगळी चेंजिंग रूम नसल्याने महिला खेळाडूंना मुलांसमोर नाईलाजास्तव कपडे चेंज करावे लागत आहेत. खरंतर जिल्हा क्रीडा अधिकारी या स्वतः एक महिला खेळाडू आहेत. वेळोवेळी त्यांना या समस्येविषयी लेखी तक्रारीद्वारे ही माहिती देण्यात आली. मात्र अधिकाऱ्यांनी या विषयांना कधीही गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे खेळाडूंना आणि प्रशिक्षकांना सतत अडचणीचा सामना करावा लागतोय. याविषयी आम्ही जिल्हा क्रीडा अधिकारी यांना विचारले असता लवकरच या समस्याचे निराकरण करू असे त्यांनी सांगितले.
या मैदानावर सराव करणाऱ्या अनेक खेळातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार झाले आहेत. यामध्ये हँडबॉल या खेळामध्ये बरेच खेळाडू घडवले विशेष म्हणजे येथे मोफत प्रशिक्षण दिले जाते. उद्देश केवळ एवढाच की जास्तीत जास्त संख्येने भंडारा जिल्ह्यातील हँडबॉल खेळाडूंनी देशाचे प्रतिनिधित्व करावे, मात्र शासकीय प्रशिक्षक नाही, असे सांगत सतत दुर्लक्ष केले जात आहे. तरीही प्रशिक्षकांनी आणि खेळाडूंनी कधीही हार मानली नाही स्वतः ग्राउंड तयार केले, संघर्ष करून लाईट लावून घेतले. मात्र मागील कित्येक महिन्यांपासून इथे लाईटची सुविधा नाही. वारंवार तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे अंधारातच मुले खेळतात. बरेचदा यामुळे योग्य प्रकारे प्रशिक्षण घेता येत नाही. बरेचदा खेळाडूंना जखमा होतात. मात्र, काही केल्या अधिकारी लाईट सुरु करत नसल्याने मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना खेळाडू आणि प्रशिक्षकांना करावा लागत आहे. आम्हाला खेळासाठी लागणाऱ्या सुविधा मिळाल्यास अजून चांगले खेळाडू निर्माण होऊ शकतात. असे असले तरी जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडून तसा प्रतिसाद मिळत नसल्याची भावना प्रशिक्षकांनी बोलून दाखविली आहे.