नवी दिल्ली - भारताची महिला ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीने सध्याच्या विश्वविजेत्या जु वेनजुनला नमवून जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. मार्चच्या एफआयडीई रेटिंगनुसार जागतिक रॅपिड चँपियन हम्पी चीनच्या यिफान हौ नंतर दुसर्या स्थानावर आहे.
हेही वाचा - आयपीएलसाठी 'थाला' चेन्नईत दाखल, नवीन लुक ठरतोय सोशल मीडियावर 'किलर'
हम्पीने केर्न्स चषक बुद्धिबळ स्पर्धा जिंकली आहे. तिने अंतिम फेरीत भारताच्या द्रोणावल्ली हरिकाशी बरोबरी साधली आणि स्पर्धेत सर्वाधिक ६ गुणांची कमाई करत विजेतेपदाला गवसणी घातली. हम्पी २५८६ गुणांसह दुसऱ्या तर, यिफान २६५८ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. कनिष्ठ मुलींच्या गटात तामिळनाडूची आर. वैशाली नवव्या स्थानावर आहे.
माजी विश्वविजेता विश्वनाथन आनंद १६ व्या तर विदित संतोष गुजराती २२ व्या स्थानी आहे. नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन खुल्या क्रमवारीत प्रथम क्रमांकावर विराजमान आहे.