काठमांडू - गौरव बालियन आणि अनिता शेरॉन यांनी शेवटच्या दिवशी सोमवारी जिंकलेल्या सुवर्ण पदकांमुळे भारताच्या खात्यात एकूण १४ सुवर्णपदकांची नोंद झाली आहे. १३ व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी कुस्तीपटूंनी उत्तम कामगिरी केली. बालियनने पुरुषांच्या ७४ किलो वजनी गटात तर शेरॉनने ६८ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले. भारतीय पुरुष आणि महिला कुस्तीपटूंनी प्रत्येकी सात सुवर्ण पदके जिंकली आहेत.
हेही वाचा - पराभवानंतर सहकाऱ्यांवर भडकला विराट, म्हणाला 'ही' गोष्ट सुधारा अन्यथा जिंकणं कठिण
या स्पर्धेत एकूण २० वजनी गट समाविष्ट होते. मात्र, प्रत्येक देशाला केवळ १४ वजनी गटात सहभाग नोंदवता येणार होता. २०१६ नंतर प्रथमच आंतरराष्ट्रीय पातळीवर मैदानात परतलेल्या शेरॉनने श्रीलंकेच्या महिला कुस्तीपटूला ४८ सेंकदामध्ये हरवत सुवर्णपदक पटकावले. तर, युवा कुस्तीपटू बालियनने एकतर्फी सामन्यात बांगलादेशच्या कुस्तीपटूचा पराभव करत सुवर्णपदक जिंकले आहे.
तत्पूर्वी, रविवारी रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणारी साक्षी मलिक (६२ किलो), रवींद्र (६१ किलो), अंशु (५९ किलो) आणि पवन कुमार (८६ किलो) यांनीही सुवर्णपदके जिंकली आहेत.