नवी दिल्ली - कोरोना विषाणूमुळे जगभरातील क्रीडा उपक्रम मार्चपासून रखडले होते. मात्र, तीन महिन्याच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर स्पॅनिश फुटबॉल लीग ला-लीगाच्या हंगामाला सुरूवात झाली. सेव्हिलाने पहिल्या सामन्यात स्थानिक प्रतिस्पर्धी रियल बेटिसवर 2-0 अशी मात केली
जर्मनीच्या बुंडेस्लिगा नंतर नव्याने सुरू होणारी ही युरोपमधील दुसरी मोठी लीग आहे. यानंतर इंग्लंड प्रीमियर लीग आणि इटालियन लीग परतणार आहेत. दक्षिण स्पेनच्या या दोन संघांदरम्यान हा सामना कडक सुरक्षा नियमांखाली खेळला गेला.
असा खेळला गेला सामना -
जेव्हा चेंडू मैदानातून बाहेर जाईल, तेव्हा त्याला संसर्गमुक्त करणे गरजेचे आहे, असे 'बॉल बॉय'ला सांगण्यात आले होते. त्याशिवाय रेफरीशी बोलताना खेळाडूंना योग्य अंतर राखण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. गोल साजरा करताना खेळाडूंना किमान संपर्क साधण्यासही सांगितले गेले होते. पण जेव्हा 56 व्या मिनिटाला लुकास ओकामपोस पेनल्टीवर गोल केला, तेव्हा सेव्हिला खेळाडूंनी एकमेकांना मिठी मारून आनंद व्यक्त केला. त्यानंतर 62 व्या मिनिटाला फर्नांडोने हेडरकडून दुसरा गोल केला, तेव्हाही खेळाडूंनी एकमेकांना मिठी मारून आनंद व्यक्त केला.
43,000 क्षमतेच्या ह्या रॅमन सांचेज पिजुआन स्टेडियमध्ये प्रेक्षकांना येण्याची परवानगी नव्हती. जसे व्हिडिओ गेममध्ये व्हर्च्युअल प्रेक्षक आणि रेकॉर्ड केलेला आवाज असतो तसा आवाज टीव्ही प्रसारणामध्ये ऐकवण्यात आला.