लिस्बन - पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने मैदानाबाहेर आणखी एक मैलाचा दगड गाठला आहे. सोशल मीडियावर ५०० मिलियन फॉलोअर्स असणारा तो जगातील पहिला व्यक्ती ठरला आहे.
रोनाल्डोचे इन्स्टाग्रामवर २६१ मिलियन, फेसबुकवर १२५ मिलियन, आणि ट्विटरवर ९१ मिलियन फॉलोअर्स आहेत. ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या सेलिब्रिटीजमध्ये रोनाल्डो अव्वल आहे. रोलाल्डोने नुकताच आपला ३६वा वाढदिवस साजरा केला.
हेही वाचा - क्रिकेटच्या सामन्यासाठी एका वर्षानंतर स्टेडियममध्ये परतले प्रेक्षक!
आपल्या कारकिर्दीत त्याने ५ चॅम्पियन लीग, २ ला-लीगा, ३ प्रीमियर लीग, २ सिरी असे ३० पेक्षा अधिक किताब पटकावले आहेत. त्याने आपल्या फुटबॉल कारकिर्दीत ५ वेला बलोन डी ओर पुरस्कारही मिळवला आहे.
काही दिवसांपूर्वी नोंदवला विश्वविक्रम -
काही दिवसांपूर्वी नेपोलीविरुद्ध सामना खेळताना जुव्हेंटसच्या रोनाल्डोने विश्वविक्रम केला. या विक्रमाद्वारे रोनाल्डो फुटबॉलच्या इतिहासातील सर्वाधिक गोल करणारा फुटबॉलपटू ठरला आहे. रोनाल्डोच्या खात्यात आता ७६० गोल झाले आहेत. त्याने जोसेफ बिकनच्या ७५९ गोलच्या विक्रमाला मागे टाकले. स्पॅनिश फुटबॉल क्लब रियाल माद्रिदसाठी रोनाल्डोने सर्वाधिक ३११ गोल केले आहेत. याव्यतिरिक्त त्याने मॅन्चेस्टर युनायटेडसाठी ८४, स्पोर्टिंग सीपीसाठी ३ आणि जुव्हेंटसकडून ६७ गोल केले आहेत.
पोर्तुगाल संघासाठी रोनाल्डोने १७० सामन्यात १०२ गोल केले आहेत. तो पोर्तुगालच्या अंडर-१५, अंडर-१७, अंडर-२०, अंडर-२१ आणि अंडर-२३ संघातही खेळला आहे.