साउथम्पटन - आयसीसीने आयोजित केलेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याची जगभरातील क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. उद्या शुक्रवारपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात हा महामुकाबला खेळला जाणार आहे. इंग्लंडच्या साउथम्पटन येथे १८ ते २२ या दरम्यान, दोन्ही संघ या सामन्यासह विजेतेपद पटकावण्यासाठी आतूर आहेत.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाऊस खोडा घालू शकतो. साउथम्पटनच्या हवामान अंदाजानुसार, पुढील पाच दिवसामधील चार दिवशी पाऊस होण्याची शक्यता आहे. आयसीसीने अंतिम सामन्यासाठी पावसाची शक्यता लक्षात घेऊन एक दिवस राखीव ठेवला आहे. परंतु हवामानाची स्थिती पाहता एक दिवस पुरणार नाही.
फ्रान्समध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हा पट्टा शुक्रवारपर्यंत उत्तर दिशेला सरकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे साउथम्पटनमध्ये विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. शुक्रवारी ९०, शनिवारी ४०, रविवारी ८० आणि सोमवारी ७० टक्के पावसाची शक्यता आहे. जर पावसाने साउथम्पटनमध्ये हजेरी लावली तर क्रिकेट चाहत्यांचा हिरमोड होऊ शकतो.
- न्यूझीलंडचा संघ -
- केन विल्यमसन ( कर्णधार), टॉम ब्लंडल, ट्रेंट बोल्ट, डेव्हॉन कॉनवे, कॉलीन डी ग्रँडहोम, मॅट हेन्री, कायले जेमिन्सन, टॉम लॅथम, हेन्री निकोल्स, अजाझ पटेल, टीम साऊदी, रॉस टेलर, नेल वॅगनर, बीजे वॉटलिंग आणि विल यंग.
- भारताचा संघ -
- रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, ऋषभ पंत, वृद्धीमान साहा, आर अश्विन, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव आणि मोहम्मद सिराज.
हेही वाचा - कॅमेऱ्याला पाहू की तुला? बुमराहचा खट्याळ प्रश्न; पाहा संजनाने घेतलेली जसप्रीतची मुलाखत
हेही वाचा - WTC Final : विराट सेना मैदानात उतरण्यास सज्ज, समोर आला फोटो