साउथम्पटन - जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा संघ मजबूत स्थितीत आहे. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भारतीय धुरंदरांना २१७ धावांत रोखलं आहे. त्यानंतर न्यूझीलंडने २ बाद १०१ अशी सावध सुरूवात केली आहे. आज सामन्याचा चौथा दिवस असून पावसामुळे अद्याप सामन्याला सुरूवात झालेली नाही. पण न्यूझीलंडच्या गोलंदाजांच्या तुलनेत भारतीय गोलंदाज टिच्चून मारा करण्यात अपयशी ठरले. न्यूझीलंडचे माजी वेगवान गोलंदाज सायमन डूल यांनी याचं कारण सांगितलं आहे.
सायमन डूल म्हणाले, भारतीय गोलंदाजांना सरावासाठी वेळ मिळाला. त्यांनी सामन्यापूर्वी १०-१२ दिवसांत बरीच षटके गोलंदाजी केलीही असेल. त्यामुळे अंतिम सामन्याच्या तयारीसाठी त्यांना मदतही झाली असेल. परंतु, केवळ सराव करणे आणि सराव करण्यासाठी सामना खेळणे या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत.
तुम्ही सराव करताना सामन्यातील परिस्थिती निर्माण करू शकत नाही. तुम्ही आपापसात सामना खेळू तर शकता. पण त्याचा फारसा उपयोग होत नाही. सराव सामना खेळून तुमची जी तयारी होते, ती केवळ नेट्समध्ये सराव करून होत नाही. याच गोष्टीचा भारतीय गोलंदाजांना फटका बसला, असे डूल यांनी सांगितले.
दरम्यान, भारतीय संघाने आपला अखेरचा कसोटी सामना मार्चमध्ये खेळला होता. तर दुसरीकडे न्यूझीलंडने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याआधी इंग्लंडविरुद्ध २ कसोटी सामन्याची मालिका खेळली. यात त्यांनी १-० ने विजय मिळवला. न्यूझीलंड संघाला या मालिकेचा फायदा झाल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केलं आहे. यात डूल यांच्या नावाची भर पडली आहे.
हेही वाचा - WI vs SA: होल्डर पकडला जबरदस्त झेल; फलंदाज, गोलंदाज सगळेच हैराण, पाहा व्हिडिओ
हेही वाचा - WTC Final : चौथ्या दिवसांचा खेळ होणार की नाही, दिनेश कार्तिकने दिले अपडेट