साउथम्पटन - भारत आणि न्यूझीलंड यांच्यात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना साउथम्पटनमध्ये खेळला जात आहे. न्यूझीलंडने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्याचा हा दुसरा दिवस आहे. कारण पहिल्या दिवशी पावसाने खेळ रद्द करण्यात आला होता. दरम्यान, विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाचा हा न्यूझीलंडविरुद्धचा सहावा सामना आहे. आम्ही तुम्हाला उभय संघातील नाणेफेक विषयीचे काही खास फॅक्ट सांगणार आहोत.
विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळताना भारतीय संघाला नाणेफेक गमावणे फलदायी ठरलेले नाही. कसोटी क्रिकेटमध्ये न्यूझीलंडविरुद्ध कर्णधार विराट कोहलीचा रेकॉर्ड सांगतो की, त्याने नाणेफेक गमावली तर भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागतं. आज न्यूझीलंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहलीने तिसऱ्यांदा नाणेफेक गमावली. याआधी न्यूझीलंड दौऱ्यात विराटने दोनदा नाणेफेक गमावली होती. त्या दोन्ही सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला होता. आता विराट कोहलीने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नाणेफेक गमावली आहे. यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
न्यूझीलंडविरुद्ध कर्णधार म्हणून विराट कोहलीचे रेकॉर्ड पाहिल्यास तो चांगला आहे. विराटने त्याच्या नेतृत्वात न्यूझीलंडविरुद्ध ज्या तीन सामन्यात नाणेफेक जिंकली आहे. ते तिनही सामने भारताने जिंकले आहेत. आतापर्यंत विराटने न्यूझीलंडविरुद्ध कर्णधारपदी असताना ५ कसोटी सामने खेळली आहेत. यात भारताने ३ सामने जिंकले आहेत. तर दोन सामने गमावले आहेत. पण आता महत्वाच्या सामन्यात विराटच्या नेतृत्वात भारतीय संघ कशी कामगिरी करणार हे पाहावं लागेल.
हेही वाचा - WTC FINAL : टीम इंडियाकडून भर मैदानात मिल्खा सिंहांना अनोखी श्रद्धांजली
हेही वाचा - भारताचे महान धावपटू मिल्खा सिंह यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार