अबुधाबी - कोलकाता नाइट रायडर्सचा फिरकीपटू गोलंदाज वरुण चक्रवर्ती विकेट घेतल्यानंतर जल्लोष करताना पाहायला मिळत नाही. याचे कारण खुद्द वरुण चक्रवर्तीने सांगितलं आहे.
वरुण चक्रवर्तीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका निभावली. त्याने आरसीबीविरुद्धच्या सामन्यात 13 धावा देत 3 गडी बाद केले. त्याच्यासह इतर गोलंदाजांच्या कामगिरीच्या जोरावर केकेआरने बंगळुरूला 92 धावांत ऑलआउट केलं.
वरुण चक्रवर्ती सामना संपल्यानंतर म्हणाला की, मला अबुधाबीचे मैदान खूप पसंत आहे. येथे गोलंदाजी करताना मज्जा येते. कारण येथील खेळपट्टी मला सूट करणारी आहे. मला जास्त टर्न घेणारी खेळपट्टी आवडत नाही. मला फ्लॅट खेळपट्टीवर गोलंदाजी करण्यास आवडतं.
विकेट घेतल्यानंतर जल्लोष साजरा करुन मी आपल्या लय गमावू इच्छित नाही. मी जर जास्त जल्लोष साजरा केला तर कदाचित मी पुढील चेंडूवर काय करायचे आहे, हे विसरू शकतो. यामुळे मी जास्त जल्लोष साजरा करत नाही. पण मी सामना संपल्यानंतर जल्लोष करतो, असे देखील वरुण चक्रवर्तीने सांगितलं.
केकेआरचा आरसीबीवर मोठा विजय
कोलकाता नाइट रायडर्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 9 गडी राखून पराभव केला. या विजयासह केकेआरचे स्पर्धेतील आव्हान कायम आहे. केकेआरच्या शिस्तबद्ध माऱ्यासमोर आरसीबीचा संघ 19 षटकात 92 धावांवर सर्वबाद झाला. तेव्हा केकेआरने हे आव्हान 1 गड्याच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले. शुबमन गिलने 34 चेंडूत 48 धावांची खेळी साकारली.
हेही वाचा - INDW vs AUSW: 'रन मशीन' मिताली राजचा करिश्मा, महिला क्रिकेटमध्ये रचला आणखी एक विक्रम
हेही वाचा - न्यूझीलंड नंतर इंग्लंडचा पाकमध्ये खेळण्यास नकार; रमीज राजा म्हणाले, आम्ही मैदानात बदला घेऊ