लंडन - सलामीवीर फलंदाज लोकेश राहुल (नाबाद 127) आणि हिटमॅन रोहित शर्मा (83) यांच्या शानदार खेळीच्या बळावर भारतीय संघाने लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर इंग्लंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर तीन विकेट गमावून 276 धावा केल्या आहेत. लोकेश राहुल 248 चेंडूचा सामना करत 12 चौकार व एका षटकाराच्या मदतीने नाबाद 127 धावा आणि अजिंक्य रहाणे 22 चेंडूत एक काढून खेळपट्टीवर आहेत. इंग्लंडकडून जेम्स अंडरसनने दोन तर ओली रॉबिंसनने एक बळी घेतला.
पावसामुळे नाणेफेकीला विलंब झाला होता. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजी करताना भारताने दमदार सुरुवात केली. भारतीय सलामीवीर रोहित शर्मा व के.एल. राहुलने पहिल्या विकेटसाठी 126 धावांची भागीदारी केली.
रोहित शतकापासून वंचित राहिला. राहितेने 145 चेंडूमध्ये 11 चौकार व एका षटकाराच्या मदतीने 83 धावा केल्या. रोहितनंतर मैदानात उतरलेल्या चेतेश्वर पुजाराने 23 चेंडूत एक चौकाराच्या मदतीने 9 धावा करून तो बाद झाला. त्यानंतर कर्णधार विराट कोहली व राहुलने टीम इंडियाला मोठ्या धावसंख्येकडे माग्रस्थ केले. दोन्ही फलंदाजांनी तिसऱ्या विकेटसाठी 117 धावा जोडल्या. त्यानंतर विराट कोहली 103 चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने 42 धावा काढून बाद झाला.