नवी दिल्ली : दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला केनियातील 'मसाई मारा' समुदायाने त्याच्या विशेष कामगिरीबद्दल सन्मानित केले आहे. येथे या समुदायाच्या लोकांनी सचिन तेंडुलकरला 'गार्ड ऑफ ऑनर' दिला आहे. याचे काही फोटो सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सचिन त्याच्या कुटुंबासह केनियामध्ये सुट्टी घालवत आहेत. तेथून तो सोशल मीडियावर चाहत्यांसाठी फोटो शेअर करत आहे.
फोटोला 5 लाखांहून अधिक लाईक्स : मास्टर ब्लास्टरने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सचिन तेंडुलकरला मसाई मारा समुदायाच्या लोकांनी 'गार्ड ऑफ ऑनर' देऊन सन्मानित केल्याचे दिसत आहे. फोटो शेअर करताना सचिनने लिहिले की, 'मसाईच्या पद्धतीने गार्ड ऑफ ऑनर. मला त्यांचे आशीर्वाद मिळाले हा मी माझा सन्मान समजतो'. सचिनने तेथे मसाई लोकांसोबत नृत्याचाही आनंद घेतला. त्याच्या या फोटोला आतापर्यंत 5 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. याशिवाय चाहते फोटोवर सतत कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
सचिन तेंडुलकर सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहे : सचिन तेंडुलकर सोशल मीडियावर फार अॅक्टिव्ह आहे. तो सतत विविध पोस्टद्वारे चाहत्यांशी संवाद साधत असतो. एका आठवड्यापूर्वी सचिनने आपली पत्नी आणि मुलीसह केनियामध्ये सुट्टी घालवतानाची छायाचित्रे पोस्ट केली होती. या फोटोंमध्ये सचिनचे कुटुंब चित्ता, शहामृग आणि जिराफांसोबत दिसत होते. या पोस्टला 1 दशलक्षाहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत.
अश्विनला वगळण्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते : सचिनने नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनलमध्ये रविचंद्रन अश्विनला वगळण्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच त्याने ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेडची देखील प्रशंसा केली होती, ज्यांनी पहिल्याच दिवशी सामन्यावर पकड मिळवत भारताला विजयापासून दूर नेले होते.
हेही वाचा :