नवी दिल्ली : गेल्या बऱ्याच काळापासून दुखापतीमुळे संघाबाहेर असण्याऱ्या जसप्रीत बुमराहची अनुपस्थिती भारतीय गोलंदाजांनी अद्याप जाणवू दिलेली नाही. बुमराहने गेल्या वर्षी सप्टेंबरपासून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. त्याच्या पुनरागमनामुळे भारतीय संघाच्या गोलंदाजीला धार मिळेल. भारतीय कर्णधार रोहित शर्माने सांगितले की, तो लवकरच संघात सामील होणार आहे. पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू होणाऱ्या चार कसोटी सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांमध्ये बुमराह संघात पुनरागमन करू शकेल, अशी आशा रोहितने व्यक्त केली आहे.
बुमराहचा एनसीएमध्ये सराव : 29 वर्षीय जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी त्याची संघात निवड झालेली नाही. त्याने नुकताच राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये नेटवर गोलंदाजीचा सराव केला आहे. त्याचे सरावात पुनरागमन झाल्यामुळे तो लवकरच टीम इंडियातही पुनरागमन करू शकतो, असे मानले जात आहे. कर्णधार रोहित शर्मा न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेतील विजयानंतर म्हणाला, 'मला आशा आहे की बुमराह ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या दोन कसोटीत खेळेल. मालिकेदरम्यान आम्ही कोणताही धोका पत्करू शकत नाही. बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. आम्ही एनसीए मधील फिजिओ आणि डॉक्टरांकडून त्याच्या प्रकृतीबद्दल अपडेट्स घेत आहे. त्याला तंदुरुस्त होण्यासाठी पूर्ण वेळ दिला जाईल.
मालिका सोपी नाही : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने सांगितले की, ऑस्ट्रेलियाविरुद्धची चार कसोटी सामन्यांची मालिका सोपी नसेल. ऑस्ट्रेलियाच्या आव्हानासाठी टीम इंडिया सज्ज आहे. तो म्हणाला की, आम्ही जगातील पहिल्या क्रमांकाच्या संघाचा सामना करण्यासाठी सज्ज आहोत. रँकिंगबाबत आम्हाला फारशी चिंता नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना जिंकण्याच्या मानसिकतेनेच आम्ही मैदानात उतरू. भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचे वेळापत्रक - पहिला सामना 9-13 फेब्रुवारी, नागपूर ; दुसरा सामना 17-21 फेब्रुवारी, दिल्ली ; तिसरा सामना 1-5 मार्च, धर्मशाला ; चौथा सामना 9-13 मार्च ; अहमदाबाद.
भारताची अव्वल स्थानी झेप : इंदूरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या सामन्यात विजय मिळवत भारतीय संघ आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. एकदिवसीय क्रमवारीत भारताचे 114 गुण आहेत. पहिल्या स्थानावर असलेल्या न्यूझीलंडची चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे. त्यांचे 111 गुण आहेत.
हेही वाचा : Womens IPL Auction : महिला आयपीएलसाठी संघांचा आज लिलाव, 'या' कंपन्या लावणार बोली