दुबई - विराट कोहलीच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा पराभव केला. आरसीबीच्या विजयानंतर विराट कोहलीने ग्लेन मॅक्सवेल आणि हर्षल पटेलच्या कामगिरीचे कौतुक केले. आरसीबीकडून मॅक्सवेलने 37 चेंडूत 56 धावांची खेळी केली. तर हर्षल पटेलने हॅट्ट्रिकसह 4 गडी बाद केले.
विराट कोहली सामना संपल्यानंतर म्हणाला की, ग्लेन मॅक्सवेलची खेळी अविश्वसनीय होती. जसप्रीत बुमराहविरुद्ध तुम्हाला सर्वश्रेष्ठ कामगिरी करावी लागते. आम्ही आणखी 15 धावा कमी केल्या. आमची सुरूवात पाहता आम्हाला 20-25 धावा करायला हव्या होत्या.
हर्षल पटेलने या सामन्यात हॅट्ट्रिक घेतली. अशी कामगिरी करणारा तो आरसीबीची तिसरा गोलंदाज ठरला. याविषयी विराट म्हणाला की, डेनियल ख्रिश्चियनला गोलंदाजी दिली पाहिजे असे मला वाटत होते. कारण त्याच्याकडे अनुभव आहे. पण हर्षल पटेलने जे केले ते अविश्वसनीय होते.
दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 165 धावा केल्या होत्या. यात विराट कोहली आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी वैयक्तिक अर्धशतके झळकावली. प्रत्युत्तरादाखल मुंबईचा संघ 18.1 षटकात 111 धावांवर सर्वबाद झाला. आरसीबीकडून हर्षल पटेलने सर्वाधिक 4 गडी बाद केले. तर युझवेंद्र चहलने 3, मॅक्सवेलने 2 आणि सिराजने एक गडी बाद केला.
हेही वाचा - IPL 2021 : केकेआर खरेचं कौतुकास पात्र आहे - महेंद्रसिंग धोनी
हेही वाचा - SRH vs RR : प्ले ऑफ शर्यतीत राहण्यासाठी राजस्थानला विजय आवश्यक; समोर हैदराबादचे आव्हान