साउथम्पटन - जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या सहाव्या व निर्णायक दिवशी भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर शरणागती पत्कारली. भारताने ९९ धावांत ८ गडी गमावले. परिणामी न्यूझीलंडला विजेतेपदासाठी १३९ धावांचे माफक लक्ष्य मिळाले आहे.
पाचव्या दिवसाअखेर भारतीय संघाने २ बाद ६४ धावा केल्या होत्या. आज सहाव्या दिवशी भारताने ६४ धावांवरुन पुढे खेळण्यास सुरूवात केली. तेव्हा उपाहारापर्यंत भारताचा अवस्था ५ बाद १३० अशी झाली. काइल जेमिसनने विराट कोहली (१३), चेतेश्वर पुजारा (१५) यांना बाद केलं. तर अजिंक्य रहाणेला (१५) बोल्टने माघारी धाडलं. उपहारानंतर ऋषभ पंत आणि रविंद्र जडेजा या जोडीवर भारतीय संघाची मदार होती. परंतु, नील वॅग्नरने रवींद्र जडेजाला तंबूचा रस्ता दाखवला. जडेजाने १६ धावा केल्या. त्याचा झेल वॉटलिंगने घेतला. ७०व्या षटकात मोठा फटका खेळण्याच्या नादात पंतने विकेट फेकली. बोल्टच्या गोलंदाजीवर निकोलसने त्याचा झेल टिपला. त्याने वैयक्तिक ४१ धावा केल्या.
पंतनंतर बोल्टने अश्विनला टेलरकरवी झेलबाद केले. त्याने ७ धावा केल्या. यानंतर शमी (१३) आणि बुमराह (०) यांनी मैदानात हजेरी लावण्याचे काम केले. न्यूझीलंडकडून दुसऱ्या डावात टिम साऊदीने सर्वाधिक ४ बळी घेतले. बोल्टने ३, जेमीसनने २ तर नील वॅगनरने १ बळी घेतला.
हेही वाचा - तब्बल ६१ वर्षानंतर आफ्रिका क्रिकेट इतिहासात गोलंदाजाने घेतली हॅट्ट्रिक!
हेही वाचा - WTC Final: मोहम्मद शमी भरमैदानात टॉवेलमध्ये; चाहते म्हणाले, आता लुंगी डान्स होईल