पल्लेकेले (श्रीलंका) IND vs NEP : आशिया कप 2023 चा 5 वा सामना भारत आणि नेपाळ यांच्यात खेळला गेला. या सामन्यात भारतानं नेपाळचा 10 विकेट्सनी पराभव केला. भारताकडून दोन्ही सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी अर्धशतकीय खेळी खेळली.
भारताचा दणदणीत विजय : रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्या वादळी अर्धशतकाच्या बळावर भारतानं नेपाळचा दहा विकेटनं पराभव केला. या विजयासह भारतानं आशिया चषकाच्या सुपर 4 फेरीत प्रवेश केला आहे. पावसानं प्रभावित झालेल्या सामन्यात डकवर्थ लुईस नियमांनुसार भारताला विजयासाठी 23 षटकात 145 धावांचं आव्हान दिलं होतं. भारतानं हे आव्हान सहज पार केलं. भारतानं 20.1 षटकात 147 धावांपर्यंत मजल मारली. रोहित शर्मानं नाबाद 74 तर शुभमन गिल याने नाबाद 67 धावांची खेळी केली.
आशिया कप 2023 च्या सुपर-4 मध्ये प्रवेश : या विजयासह भारतीय क्रिकेट संघानं आशिया कप 2023 च्या सुपर-4 मध्ये प्रवेश केला आहे. भारतीय संघ सोमवारी (4 सप्टेंबर) नेपाळविरुद्ध आशिया चषकातील दुसरा सामना खेळला. या सामन्यातही पावसानं व्यत्यय आणला. मात्र या सामन्यात विजयाची नोंद करून भारतीय संघ सुपर-4 साठी पात्र ठरला आहे.
भारतानं नेपाळला लोळवलं : पल्लेकेले स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात नेपाळ संघानं नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना 230 धावा केल्या. आसिफ शेखनं झटपट अर्धशतकी खेळी खेळली. त्यानं 58 धावा केल्या. तर सोमपाल कामीने 48 धावांची खेळी केली. भारतीय संघाकडून वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजानं प्रत्येकी 3 बळी घेतले. तर मोहम्मद शमी, हार्दिक पांड्या आणि शार्दुल ठाकूर यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाला.
भारताला 23 षटकांत 145 धावांचं लक्ष्य : यानंतर २३१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ 2.1 षटकात एकही विकेट न गमावता केवळ 17 धावा केल्या होत्या. मात्र, त्यानंतर पावसामुळं खेळ थांबवण्यात आला. पावसामुळं बराच वेळ वाया गेला. त्यानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला 23 षटकांत 145 धावांचं लक्ष्य देण्यात आलं.
एकही विकेट न गमावता सामना जिंकला : नव्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघानं 20.1 षटकात एकही विकेट न गमावता 147 धावा करत सामना जिंकला. भारतीय कर्णधार रोहित शर्मानं शानदार पद्धतीनं अर्धशतक ठोकलं. या सामन्यात त्यानं 59 चेंडूत नाबाद 74 धावा केल्या. तर शुभमन गिलही 62 चेंडूत 67 धावा करून नाबाद राहिला.