ब्रिस्बेन - गाबा मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांत बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेचा चौथा सामना सुरू आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाच्या वॉशिंग्टन सुंदर-शार्दुल ठाकुर या जोडीने फलंदाजीत कमालीचे साहस दाखवले. या साहसाबद्दल भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने कौतुक केले आहे.
रविवारी ब्रिस्बेन कसोटीच्या तिसर्या दिवशी वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूर यांनी आपले पहिले कसोटी अर्धशतक पूर्ण केले. शिवाय, त्यांमी सातव्या विकेटसाठी १२३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. या कामगिरीवर सेहवाग म्हणाला, ''जर तुम्ही भारतीय संघाच्या धैर्याचे एका शब्दात वर्णन केले, तर तो शब्द म्हणजे दबंग. दबदबा निर्माण करणारा, अत्यंत धैर्यवान आणि अति सुंदर ठाकुर."
माजी भारतीय फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणनेही या दोन युवा फलंदाजांचे कौतुक करताना म्हटले आहे की, सुंदर आणि ठाकुरचे कसोटीत प्रथमच अर्धशतक ठोकल्याबद्दल अभिनंदन. तुमचे तंत्र विलक्षण आहे. युवा गोलंदाजांसाठी हे एक उदाहरण असेल, की त्यांना गोलंदाजीसोबत फलंदाजीतही योगदान द्यावे लागेल.
शार्दुलने ११५ चेंडूचा सामना करताना ९ चौकार आणि दोन षटकाराच्या मदतीने ६७ धावांची खेळी केली. तर सुंदरने १४४ चेंडूचा सामना करताना सात चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ६२ धावांची खेळी साकारली.