ब्रिस्बेन - भारतीय क्रिकेट टीम ब्रिस्बेनमध्ये लागू असलेल्या कडक लॉकडाऊन नियमांमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील चौथा व अंतिम कसोटी सामना गाबा मैदानावर खेळण्यास उत्सूक नाही. त्या पार्श्वभूमीवर क्वींसलँड सरकारने म्हटले आहे, की पाहुणा संघ जर राज्यातील प्रोटोकॉल्स पाळायला इच्छुक नसेल तर या संघाने आमच्याकडे येऊच नये. जर भारतीय संघाला क्वारंटाईन केले जाणार असेल तर संघ ब्रिस्बेनला जाण्यास इच्छुक नाही.
क्वींसलँड सरकारमधील सदस्यानी म्हटले, की भारतीय संघाला नियमांचे पालन करावेच लागेल. त्यांच्यापुढे कोणताच पर्याय नाही.
क्वींसलँडचे आरोग्यमंत्री रोस बेट्स यांनी एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, भारतीय टीम नियमांचे पालन करणार नसेल तर त्यांनी ब्रिस्बेनला येऊ नये.
क्वींसलँडचे क्रीडा मंत्री टिम मेंडर यांनी म्हटले, की प्रोटोकॉल्सचे उल्लंघन करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. प्रत्येकाला या प्रक्रियेतून जावे लागेल. भारतीय क्रिकेट टीम ब्रिस्बेनमध्ये विलगीकरणाच्या गाइडलाइन्सचे पालन करणार नसेल तर त्यांनी इकडे येऊच नये. सर्वांसाठी नियम समान आहेत.