मुंबई - भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन तुल्यबळ संघात बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेचा शेवटचा सामना गाबा मैदानावर खेळवण्यात आला. या सामन्यात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वातील टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला ३ गडी राखून चितपट केले. या ऐतिहासिक विजयासह भारताने ही कसोटी मालिकाही २-१ अशी जिंकली. या दिमाखदार कामगिरीनंतर अनेक दिग्गज व्यक्तींनी सोशल मीडियाद्वारे भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या. यात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचेही नाव जोडले गेले आहे.
हेही वाचा - ब्रिस्बेनमध्ये टीम इंडियाच्या नावावर विक्रमच विक्रम!
शरद पवार यांनी ट्विट करून भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. ''गाबा खेळपट्टीवर ३२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियन संघाला थरारक कसोटी सामन्यात धूळ चारणाऱ्या भारतीय संघाचे मनपूर्वक अभिनंदन! अजिंक्य रहाणेच्या संघाने बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका जिंकून नवा इतिहास घडवला'', असे पवारांनी ट्विटमध्ये म्हटले.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. अजित पवार म्हणाले, ''भारतीय क्रिकेट संघाने मराठमोळा कर्णधार अजिंक्य रहाणेच्या यशस्वी नेतृत्वाखाली लढाऊ वृत्तीने खेळून; ऑस्ट्रेलियातील मैदानावर यजमान संघाचा पराभव करुन मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल संघातील सर्व खेळाडूंचं अभिनंदन! विजयाची ही घोडदौड अशीच सुरू राहो, या शुभेच्छा!''
पिछाडीनंतर मालिकेत बाजी
दरम्यान, पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा मानहानीकारक पराभव झाला. यानंतर भारतीय संघाने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात मेलबर्न येथे खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ८ गडी राखून विजय मिळवला. यानंतर हनुमा विहारी आणि आर. अश्विन यांनी संयम आणि जिद्दीने फलंदाजी करत सिडनी येथील तिसरा कसोटी सामना अनिर्णित राखला. चौथ्या कसोटी सामन्यात सांघिक खेळ करत भारतीय संघाने विजय मिळवला आणि मालिका २-१ ने जिंकली.