नवी दिल्ली - वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आणि सलामीवीर रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर चषक कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांना खेळू शकणार नाहीत. मालिकेची सुरुवात १७ डिसेंबरपासून एडिलेडमध्ये दिवस-रात्र होणाऱ्या सामन्यापासून होणार आहे.
ईएसपीएनक्रिकइन्फो या क्रीडा वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार हे दोन्ही खेळाडू शेवटची दोन कसोटी सामने खेळू शकतील. इशांत शर्माने फिटनेस टेस्ट पार केली असून ७ जानेवारीपासून सिडनीत होणाऱ्या कसोटी सामन्यासाठी त्याची जागा जवळपास पक्की आहे. यासाठी इंशातला लवकरात-लवकर ऑस्ट्रेलिया गाठणे गरजेचे आहे. दुसरीकडे, रोहितवर सध्या एनसीएमध्ये हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीवर उपचार सुरू आहेत. आयपीएलच्या 13 व्या सत्रात रोहितला ही दुखापत झाली.
दोघांना लवकरात-लवकर ऑस्ट्रेलियाला रवाना व्हावे लागेल
रोहितला डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यातच प्रवास करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. कारण अद्याप त्याचा पूर्ण फिटनेस झालेला नाही. रोहितला दोन आठवड्यांसाठी देखरेखीखाली ठेवण्यात येईल आणि त्यानंतरच 'एनसीए' त्याच्यावरील निर्णयापर्यंत पोहोचू शकेल. रोहित 8 डिसेंबरला ऑस्ट्रेलियाला रवाना झाला तर त्याला दोन आठवड्यांसाठी विलगीकरणात राहावे लागेल. त्यानंतरच 22 डिसेंबरपासून त्याला सराव करता येईल. भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी काही दिवसांपूर्वी असे म्हटले होते की, रोहित आणि ईशांतला कसोटी मालिकेत भाग घ्यायचा असल्यास लवकरात-लवकर ऑस्ट्रेलियाला रवाना व्हावे लागेल.