विशाखापट्टणम IND vs AUS 1st T-20 : विश्वचषक अंतिम सामन्याच्या 96 तासांनंतर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वातील युवा भारतीय संघ आजपासून विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना विशाखापट्टणमच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. एकदिवसीय विश्वचषक संपल्यानंतर आता सर्व संघांच्या नजरा पुढील वर्षी वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या टी-20 विश्वचषकावर आहेत. यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलियाची आजपासूनच तयारी सुरु होणार आहे.
सूर्याच्या खाद्यावर संघाची धुरा : कांगारुंविरुद्धच्या पाच सामन्याच्या मालिकेसाठी भारतीय संघाची धुरा सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आलीय. तर विश्वविजेत्या ऑस्ट्रेलिया संघाची धुरा यष्टीरक्षक फलंदाज मॅथ्यू वेड याच्यावर आहे. ऑस्ट्रेलियाविरोधात मायदेशात होत असलेल्या या पाच सामन्याच्या मालिकेसाठी भारतीय संघात बहुतांश युवा खेळाडूंचा समावेश करण्यात आलाय. पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर युवा खेळाडूंना या मालिकेत स्वतःला सिद्ध करण्याची संधी आहे. या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांसाठी 2023 च्या विश्वचषकाचा भाग असलेले फक्त तीन खेळाडू भारतीय संघात असतील. यात कर्णधार सूर्यकुमार यादव, इशान किशन आणि प्रसिध कृष्णा यांचा समावेश आहे. प्रसिध कृष्णानं विश्वचषकातील एकही सामना खेळला नाही. तर या मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांमध्ये श्रेयस अय्यर संघासोबत जोडला जाणार आहे. अय्यरकडे शेवटच्या दोन सामन्यांसाठी उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आलीय. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या 15 सदस्यीय संघात विश्वचषकात कांगारुंच्या संघाचा भाग असलेले 6 खेळाडू आहेत. अशा परिस्थितीत कांगारुंच्या संघात अधिक अनुभवी खेळाडूंचा सहभाग आहे. त्यामुळं या मालिकेत ऑस्ट्रेलियाचं पारडं जड वाटत आहे. आजच्या सामन्यातही ऑस्ट्रेलियाचा संघ फेव्हरिट ठरु शकतो.
हेड टू हेड : दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 26 टी-20 सामने झाले आहेत. यात भारतीय संघ वरचढ ठरला असून भारतीय संघानं 15 सामने जिंकले आहेत तर कांगारुंनी 10 सामन्यांत बाजी मारली आहे. दोन्ही संघांतील एक सामना अनिर्णीत राहिला होता.
टी-20 मालिकेचे वेळापत्रक :
- पहिला सामना- 23 नोव्हेंबर, गुरुवार, राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियम, विशाखापट्टणम
- दुसरा सामना- 26 नोव्हेंबर, रविवार, ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियम, तिरुवनंतपुरम
- तिसरा सामना- 28 नोव्हेंबर, मंगळवार, बारसापारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी
- चौथा सामना- 01 डिसेंबर, विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर
- पाचवा सामना- 03 डिसेंबर, राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद
मालिकेसाठी दोन्ही संघ :
- भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), ईशान किशन, यशस्वी जयस्वाल, टिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि मुकेश कुमार, अखेरच्या दोन सामन्यासाठी श्रेयस अय्यर टीम इंडियासोबत जोडला जाणार आहे. त्याच्याकडे उप कर्णधारपदाची जबाबदारी असेल.
- ऑस्ट्रेलिया : मॅथ्यू वेड (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, टीम डेव्हिड, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, शॉन अॅबॉट, जोश इंग्लिस, तन्वीर संघा, नॅथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ, स्पेन्सर जॉन्सन, अॅडम झम्पा
हेही वाचा :