अहमदाबाद Cricket World Cup 2023 : क्रिकेट विश्वचषकातील ३६ वा सामना आज इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झाला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं इंग्लडचा ३३ धावांनी पराभव केला.
ख्रिस वोक्सचे ४ बळी : आजच्या सामन्यात इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या गोलंदाजांनी सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये हा निर्णय सार्थक ठरवला. ऑस्ट्रेलियाचे फार्मात असलेले दोन्ही सलामीवीर स्वस्तात परतले. हेड ११ तर वॉर्नर १५ धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेल्या स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशेननं ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. या दोघांनी अनुक्रमे ४४ आणि ७१ धावा केल्या. मधल्या फळीतील ग्रीन आणि स्टॉइनिस यांनी चांगली फलंदाजी करत अनुक्रमे ४७ आणि ३५ धावांचं योगदान दिलं. ऑस्ट्रेलियानं ४९.३ षटकात सर्वबाद २८६ धावा केल्या. इंग्लंडकडून ख्रिस वोक्सनं ५४ धावा देत ४ बळी घेतले.
इंग्लंडला लक्ष्य पेलवलं नाही : ऑस्ट्रेलियानं दिलेल्या २८७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात अत्यंत खराब झाली. ओपनर जॉनी बेयरस्टो पहिल्याच चेंडूवर बाद झाला. जो रूटही काही कमाल करू शकला नाही. तो केवळ १३ धावा करून परतला. त्यानंतर डेव्हिड मलान आणि बेन स्टोक्सची जोडी जमली. या दोघांनीही आपापली अर्धशतकं साजरी करत संघाला सामन्यात परत आणलं. मलान ६४ चेंडूत ५० धावा करून बाद झाला. तर स्टोक्सनं ९० चेंडूत ६४ धावांचं योगदान दिलं. इंग्लंडचा संघ ४८.१ षटकात सर्वबाद केवळ २५३ धावाचं करू शकला. ऑस्ट्रेलियाकडून झम्पानं धारदार गोलंदाजी करत २१ धावा देऊन ३ बळी घेतले.
दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन :
- इंग्लंड : जॉनी बेअरस्टो, डेव्हिड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर (कर्णधार आणि यष्टिरक्षक), मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, ख्रिस वोक्स, डेव्हिड विली, आदिल रशीद, मार्क वुड
- ऑस्ट्रेलिया : डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, जोश इंग्लिस (यष्टिरक्षक), मार्कस स्टॉइनिस, पॅट कमिन्स (कर्णधार), जोश हेझलवूड, मिचेल स्टार्क, अॅडम झम्पा
हेही वाचा :