ओवल - सलामीवीर फलंदाज हसीब हमीद (नाबाद 62) आणि रोरी बर्न्स (50) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडने भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यातील पाचव्या दिवसाच्या उपहारापर्यंत 2 बाद 131 धावा केल्या आहेत. अद्याप इंग्लंडला विजयासाठी 237 धावांची गरज आहे. तर भारताला विजयासाठी इंग्लंडचे 8 गडी बाद करावे लागणार आहेत.
उपहारापर्यंत हसीब हमीद याने 187 चेंडूत 6 चौकारासह नाबाद 62 धावांची खेळी केली. तर जो रूट 14 चेंडूवर 8 धावांवर खेळत आहे. भारताकडून शार्दुल ठाकूरला एक विकेट मिळाली. तर एक धावबाद झाला.
पाचव्या दिवशी इंग्लंडने बिनबाद 77 धावांवरुन पुढे खेळण्यासाठी सुरूवात केली. संघाची धावसंख्या 100 असताना शार्दुल ठाकूरने रोरी बर्न्सला बाद करत इंग्लंडला पहिला धक्का दिला. रोरी बर्न्सने 50 धावांची खेळी केली. त्याचा झेल ऋषभ पंतने घेतला.
रोरी बर्न्सची जागा घेण्यासाठी डेविड मलान मैदानात आला. पण तो मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. हसीब हमीदच्या चूकीच्या कॉलवर मलान धावबाद झाला. बदली खेळाडू मयांक अग्रवालच्या थ्रोवर ऋषभ पंतने त्याला धावबाद केले.
डेविड मलान बाद झाल्यानंतर कर्णधार जो रुट हसीब हमीदला साथ देण्यासाठी मैदानात उतरला. या दोघांनी उपहारापर्यंत इंग्लंडला 131 धावांपर्यंत पोहोचवले.
तत्पूर्वी, भारतीय संघाने दुसऱ्या डावात 466 धावा करत इंग्लंडसमोर विजयासाठी 368 धावांचे लक्ष्य ठेवले. रोहित शर्माने 14 चौकार आणि 1 षटकारासह झंझावती 127 धावांची खेळी केली. यानंतर चेतेश्वर पुजारा (61), शार्दुल ठाकूर (60), ऋषभ पंत (50), के एल राहुल (46), विराट कोहली (44), उमेश यादव (25) आणि जसप्रीत बुमराह याने 24 धावांचे योगदान दिले.
हेही वाचा - जसप्रीत बुमराहचे 'प्लेयर ऑफ द मंथ' पुरस्कारासाठी नामांकन, हे खेळाडू शर्यतीत
हेही वाचा - टी-20 विश्वकरंडक स्पर्धेआधी पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप, मिसबाह उल हकसह वकार युनूसचा राजीनामा