नवी दिल्ली - मोटेरा स्टेडियमवर रंगणाऱ्या भारवताविरुद्धच्या शेवटच्या कसोटीपूर्वी इंग्लंड संघाने आपल्या चमूत महत्त्वाचे बदल केले आहेत. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) माजी सलामीवीर मार्कस ट्रेस्कोथिकला संघाचा नवा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे. ईसीबीने सोमवारी याची माहिती दिली. सध्या, ट्रेस्कोथिक सोमरसेट क्लबच्या सहाय्यक प्रशिक्षकपदावर कार्यरत आहे. आता लवकरच तो आपल्या पदाचा राजीनामा देईल आणि मार्चच्या मध्यावर नवीन पद स्वीकारेल.
मार्कस ट्रेस्कोथिक आता इंग्लंडच्या संघात मार्क रामप्रकाशची जागा घेईल. रामप्रकाशने सन २०१९ मध्ये फलंदाजी प्रशिक्षकपद सोडले. ट्रेस्कोथिकबरोबरच ईसीबीने न्यूझीलंडचा माजी फिरकीपटू जीतन पटेल आणि जोन लुईस यांनाही संघात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपविल्या आहेत.
जिथन पटेलची फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे, तर लुईस संघात वेगवान गोलंदाजीचे प्रशिक्षण देईल. पटेल गेल्या १८ महिन्यांपासून सल्लागार म्हणून संघाशी संबंधित होता आणि अलीकडेच त्याने पूर्ण-वेळ पदावर काम करण्याची इच्छा देखील व्यक्त केली.
राष्ट्रीय संघाबरोबरच्या नव्या भूमिकेसाठी लुईस लायन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा देईल. ईसीबी परफॉर्मन्स डायरेक्टर मो बोबॅट म्हणाले, "ट्रेस्कोथिक, लुईस आणि पटेल यांनी उच्च पातळीवर आपले कौशल्य सिद्ध केले आहे. सध्याच्या आणि भविष्यासाठी खेळाडू तयार करण्याची जबाबदारी यांची असेल."
हेही वाचा - Vijay Hazare Trophy : मुंबईचा विजयी 'पंच', हिमाचलचा २०० धावांनी केला पराभव