अहमदाबाद - भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिका सुरू होण्यापूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह इंग्लंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी -२० मालिकेत बुमराहला विश्रांती देण्यात आली होती. मोटेरावर रंगणाऱ्या चौथ्या कसोटीपूर्वी बुमराह वैयक्तिक कारणास्तव संघाबाहेर पडला.
एका क्रीडासंस्थेने दिलेल्या अहवालानुसार, बुमराह एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिका २३ मार्चपासून पुण्यात सुरू होणार आहे. बुमराहच्या अनुपस्थितीत भारताला नवीन खेळाडूंना संधी देण्याची संधी मिळेल.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेचा चौथा सामना ४ मार्चपासून मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. या मालिकेत टीम इंडिया २-१ने आघाडीवर आहे. जर हा सामना भारताने जिंकला किंवा बरोबरीत सोडवला तर, ते जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचतील.
दरम्यान, बुमराहच्या बाहेर जाण्यामुळे चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाजीचा भार अनुभवी इशांत शर्माबरोबर कोणाच्या खांद्यावर पडणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सध्या भारतीय कसोटी संघामध्ये मोहम्मद सिराज, उमेश यादव व इशांत शर्मा हे तीनच वेगवान गोलंदाज आहेत. इशांतबरोबर सिराजला संधी दिली जाण्याची दाट शक्यता आहे.
हेही वाचा - भारताचा लाडका क्रिकेटपटू बनला 'हिरो'....पाहा व्हिडिओ