नवी दिल्ली - इंग्लंविरुद्धच्या मालिकेद्वारे तब्बल वर्षभराच्या 'कोरोनाप्रतीक्षे'नंतर भारतात कसोटी क्रिकेटला सुरुवात झाली. या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेचा पहिला सामना चेन्नईत पार पडला. सांघिक कामगिरीच्या जोरावर पहिल्या कसोटीत इंग्लंडने भारताला २२७ धावांनी मात दिली. गुजरातचा फिरकीपटू अक्षर पटेल ही कसोटी खेळणार होता. मात्र, गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्याला आपले कसोटी पदार्पण लांबवावे लागले. फिरकीपटू शाहबाझ नदीमला अक्षरचा पर्याय म्हणून संघात संधी मिळाली. या कसोटीत नदीमला उत्तम कामगिरी करता आली नाही. त्यामुळे तंदुरुस्त झालेल्या अक्षरला इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी आणि स्वप्नवत कसोटी पदार्पणासाठी बोलावले गेले. १३ फेब्रुवारी २०२१ रोजी अक्षरने चेन्नईच्या चेपॉक मैदानावर कसोटी पदार्पण केले.
सामन्याच्या पहिल्या डावात अनुभवी फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने अक्षरच्या हातात फारसे काही लागू दिले नाही. मात्र, दुसऱ्या डावात अक्षरने आपणही कमी नसल्याचे दाखवून दिले. अक्षरने २१ षटकांमध्ये ६० धावा देत ५ बळी टिपले. यात त्याने ५ षटके निर्धाव टाकली. अक्षरच्या या कारनाम्यामुळे इंग्लंडचा दुसरा डाव १६४ धावांवर आटोपला आणि भारताने तब्बल ३१७ धावांनी कसोटी विजय साजरा केला. सामनावीराचा पुरस्कार अश्विन घेऊन गेला असला तरी, अक्षरचा धसका इंग्लंडच्या सर्व फलंदाजांनी घेतला.
अक्षरने इंजिनियर व्हावे...
गुजरातच्या नाडियाड शहरात राहणारा डावखुरा फिरकीपटू अक्षर शिक्षणात तरबेज होता. अव्वल क्रमवारीतील मुलाला त्याच्या आई-वडिलांनी क्रिकेटचे स्वप्न पूर्ण करण्याची परवानगी दिली. अक्षरने इंजिनियर व्हावे, असे त्याच्या वडिलांचे मत होते. मात्र, १९९६-२०१५ दरम्यान खेडा जिल्हा क्रिकेटचे सचिव व सह-सचिव असणाऱ्या संजयभाई पटेल यांनी अक्षरच्या क्रिकेटच्या कारकिर्दीला पाठिंबा दिला. तू तुझ्या फिरकी गोलंदाजीवर लक्ष दे, असे संजयभाई पटेल यांनी अक्षरला सांगितले होते.
आधी वेगवान गोलंदाज, मग फिरकीपटू...
वयाच्या १४व्या वर्षांपासून अक्षरसाठी संजयभाई पटेल यांनी प्रशिक्षण सुरू केले. अक्षर एका आंतर जिल्हा पातळीवरील स्पर्धेत सामनावीर ठरला होता. त्याला सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाज असा पुरस्कार मिळाला. फिरकीपटू होण्याआधी अक्षर वेगवान गोलंदाजी करत असे. नाडियाड जिल्ह्यातील एका वृत्तसंस्थेशी बोलताना संजयभाई पटेल म्हणाले, "अक्षर अभ्यासात खूप चांगला होता. त्याच्या पालकांना तो इंजिनियर व्हावे असे वाटत होते. आपल्या मुलाचे एक उज्ज्वल भविष्य असावे, असे प्रत्येक पालकाला वाटते. पण, मी त्याच्या वडिलांशी बोललो. त्याचे वडील शिक्षणापेक्षा क्रिकेटला प्राधान्य देणाऱ्यांपैकी एक होते."
एनसीएचा किस्सा...
संजयभाई म्हणाले, "सुरुवातीला तो डावखुरा वेगवान गोलंदाज होता. जेव्हा त्याचा संघ सामना जिंकायचा, तेव्हा तो मजेसाठी फिरकी गोलंदाजी करायचा. तो दुबळा आणि उंच होता. अचूक टप्प्यांमुळेही त्याला अनेक बळी मिळवता आले. १७-१८ वय असताना अक्षरने बंगळुरूस्थित राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या (एनसीए) २१ दिवसांच्या शिबिराला हजेरी लावली होती. आमच्या विभागातून कोणताही खेळाडू राज्यस्तरीय शिबिरात जातो, तेव्हा मी त्यांना एक डायरी घेऊन जायला सांगतो. जेणेकरून खेळाडू शिबिरादरम्यानचे काही मुद्दे डायरीमध्ये लिहू शकतात."
पण जेव्हा अक्षर शिबिर संपवून घरी परतला, तेव्हा मी त्याला डायरीची पाने फाडायला सांगितली. त्याने डायरीमध्ये काही मुद्दे लिहिले होते, जे त्याला शिबिरादरम्यान सांगण्यात आले. चेंडूला हवेत फ्लाइट देण्यासंबंधित ते मुद्दे होते. मात्र, मी त्याला नैसर्गिक शैलीनुसार गोलंदाजी करण्याचे सांगितले. जर एखादा गोलंदाज नैसर्गिक पद्धतीने गोलंदाजी करत नसेल, तर तो व्यवस्थित गोलंदाजी कशी करेल? माझ्यानंतर अक्षरला अनेक प्रशिक्षक लाभले. त्यांनीही अक्षरला व्यवस्थित मार्गदर्शन केले'', असेही संजयभाई म्हणाले.
पदार्पणाच्या कसोटी सामन्यात पाच किंवा त्याहून अधिक बळी घेणारा अक्षर पटेल हा सहावा भारतीय फिरकीपटू ठरला आहे.
हेही वाचा - शाब्बाश बापू..! अक्षर पटेलच्या 'पंच'मुळे मोठ्या विक्रमाची नोंद